आमसभेत झाला निर्णय; प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा झाली तर सहभागी क्लबांना मिळणार 3 लाख
क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
गोवा क्रिकेट संघटना आपल्या सर्व संलग्नित क्लबांना प्रत्येकी एक लाखाचे अनुदान देणार आहे. या व्यतिरिक्त यंदा प्रीमियर विभाग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन झाले तर या विभागात खेळणाऱया सर्व क्लबांना तीन लाखांचे अनुदान देण्याचा निर्णय आमसभेत झाला. काल गोवा क्रिकेट संघटनेची वार्षिक आमसभा जीसीएच्या पर्वरी येथील मुख्यालयात व्हर्च्युअल प्लेटफॉर्मवर झाली. या आमसभेत एकूण 75 क्लबांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला.
गोवा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सूरज लोटलीकर, सचिव विपुल फडके आणि खजिनदार परेश फडते यांनी यावेळी क्लबांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. आमसभेत मागील आमसभेतील इतिवृंताला मान्यता मिळविण्यात आली. वार्षिक अहवाल आणि 2020-21च्या ताळेबंदालाही यावेळी आमसभेने मान्यता दिली. 2021-22 आर्थिक वर्षांसाठी आमसभेने चार्टड अकाऊंटंट नेलिया वॅरोष्का कोता दो रेगो आणि चिराग केंकरे आणि कंपनी यांची वैधानिक आणि अंतर्गत लेखापरीक्षक म्हणून निवडीला मान्यता दिली. यावेळी आमसभेत युनियन स्पोर्ट्स क्लबचे माजी अध्यक्ष अनिल पोकळे, माजी क्रिकेटर आणि जीसीएचे अंपायर दीपक शिरगावकर, माजी भारतीय क्रिकेटपटू यशपाल शर्मा, गोव्याचे माजी रणजीपटू प्रसाद आमोणकर व जॅरी फर्नांडिस आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे क्रिकेटपटू रमेश बोर्डे यांना एक मिनिट शांतता पाळून श्रद्धांजली देण्यात आली.