विद्यार्थी तलावात पोहण्यासाठी गेला असता घडली दुर्घटना : शहापूर पोलिसात घटनेची नोंद
प्रतिनिधी / बेळगाव
जुने बेळगाव येथील श्री विसर्जन तलावात (कुंड) पोहण्यासाठी गेलेल्या एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली आहे. गेल्या पाच दिवसांपूर्वी कपिलेश्वर तलावात एका मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी आणखी एक घटना घडली आहे.
विनायक जोतिबा हरणी (वय 15, रा. ब्रम्हदेवनगर, वडगाव) असे त्या विद्यार्थ्याचे नाव असून तो नववीत शिकत होता. शहापूर पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे. विनायकची आई गीता हरणी यांनी या संबंधी फिर्याद दिली आहे. आपल्या घरात कोणालाही न सांगता सकाळी 8.45 वाजता विनायक कलमेश्वर तलावात पोहण्यासाठी गेला होता.
9.15 वाजण्याच्या सुमारास पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच शहापूरचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी विनायकचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्यानंतर तो उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविण्यात आला. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शहापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.