घरात बरीच वर्षे वापरलेलं काहीसं खराब झालेलं कार्पेट अनेकदा टाकून दिलं जातं. पण या जुन्या कार्पेटचा विविध कारणांसाठी पुन्हा वापर करता येतो. पाहुया जुने कार्पेट पुन्हा घरात वापरण्याचे विविध पर्याय….
राच्या अंतर्गत सजावटीसाठी कार्पेटचा वापर हमखास केला जातो. पारंपारिक किंवा आधुनिक शैलीतील कार्पेटचा वापर घरात केला जातो. कार्पेटमुळे घराची सुंदरता अधिकच वाढते. एखाद्या खोलीला कलात्मक साज द्यायचा असेल तर कार्पेटचा वापर योग्य ठरतो. घराची शोभा वाढविणारी ही कार्पेट्स महागडी असतात. यामुळे त्यांचा वापर जपून करावा लागतो. तसेच त्यांची स्वच्छताही नियमीत करावी लागते. काहीवेळा कार्पेट वापरून झाल्यानंतर मलूल वाटायला लागते. फार वर्षे वापरले असेल तर कार्पेट बदलणे हा त्यावरचा उपाय म्हणता येईल. नवे कार्पेट खरेदी करून पुन्हा जमिनीची शोभा प्राप्त करता येते. पण जेव्हा नवे कार्पेट आणायचा विचार केला जातो तेव्हा जुन्या कार्पेटचं करायचं काय? हा प्रश्न एखाद्याला पडला तर नवल वाटायला नको.
अनेकजण जुने कार्पेट टाकून देण्यावर भर देतात तर काही गरजवंताला जुनं कार्पेट देतात. असे कार्पेट टाकण्यापेक्षा त्याचा वापर विविध कारणासाठी पुन्हा एकदा करता येतो. कसा, कोठे जुन्या कार्पेटचा वापर करायचा ते पाहूया.
टी कोस्टर – जुन्या कार्पेटपासून टी कोस्टर बनविले जाऊ शकते. याचा वापर डायनिंग टेबलावर चहाचे कप ठेवण्यासाठी करता येतो. कार्पेट वजनाने हलके असल्यास त्याला गरजेनुरुप कॉर्क किंवा ज्युटचा आधार देता येतो. याचा आपण टेबल मॅट म्हणूनही वापर करू शकतो.
एरिया रग – जुन्या कार्पेटचे छोटे छोटे भाग करून त्यांचा एरिया रगप्रमाणे खोल्यांमध्ये सुंदर वापर करता येतो. लिव्हिंग रुम, डायनिंग रुम अशा भागांमध्ये जुन्या कार्पेटचे रग अंथरता येते. मुलांच्या खोलीत याचा वापर उत्तम ठरू शकतो. रग अंथरल्यास मुलांना गंभीर अपघात होण्याचा धोकाही कमी असतो.
कुंडय़ांसाठी – जुन्या कार्पेटचा वापर कुंडय़ांसाठीही करता येतो. कुंडय़ांच्या आकाराचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे कार्पेटचे तुकडे पाडता येतात. हे कार्पेटचे तुकडे कुंडय़ांच्या खाली ठेवता येतात. जेणेकरून कुंडीतील पाणी ओघळल्यास कार्पेटमध्ये शोषलं जाईल. पाणी आणि मातीमुळे कार्पेट घाण झाल्यास पुन्हा धुवून वापरता येतं.
पायपुसणी – आपल्या घरात दरवाजांमध्ये बहुतेक करून पायपुसणीला स्थान दिलं जातंच. आपल्या धुळीचे पाय घरभर होऊ नयेत म्हणून पायपुसणीला पाय पुसून येण्याबाबत घरातल्या वरिष्ठांकडून अनेक वेळा सुनावले जाते. जुन्या कार्पेटचा वापर पायपुसणी म्हणून करता येतो. याची मांडणी घराच्या मुख्य दरवाजाच्या आत, बाथरुम दरवाजाच्या बाहेर, किचन दरवाजाच्या आत करता येते. एकाच रंगाच्या या पायपुसणीमुळे दिसण्यात साम्य राहतं. तसेच दिसायलाही छान दिसतं.
प्राण्यांसाठी – बऱयाचशा घरांमध्ये आजकाल कुत्री किंवा मांजरे हमखास पाळली जातात. घरातला एकतरी सदस्य प्राण्यांवर प्रेम करणारा असतो. ज्यांच्या घरी पाळीव प्राणी आहेत त्यांना जुन्या कार्पेटचा वापर करता येतो. या कार्पेटचे तुकडे करून त्यावर त्या प्राण्याला बसण्याची सोय करता येते. कुत्र्याच्या आकारानुसार कमी अधिक आकाराचे कार्पेट कापून घेता येते. काहीजण घराच्या बाहेरच कुत्र्यांसाठी छोटं घर तयार करतात. तिथेही या जुन्या कार्पेटचा वापर करता येतो. पावसाळ्य़ात व हिवाळ्यात या कार्पेटची उब कुत्र्याला मिळू शकते.
याव्यतिरीक्त कार्पेटचा इतर कारणांसाठीही वापर करता येतो.
फर्निचरच्या पायांसाठी- फर्निचरच्या पायाखाली आधार देण्यासाठी कार्पेटच्या तुकडय़ांचा वापर करता येतो. जेणेकरून फर्निचरच्या पायाचे ओरखडे जमिनीवर पडणार नाहीत.
हेडबोर्डसाठी- आजकालच्या घरांमध्ये हेडबोर्डसह पलंग येतात. पलंगाच्या हेडबोर्डसाठी जुन्या कार्पेटचा वापर करता येतो. याने आरामदायी फील तर मिळतोच पण पलंगाचा लुकही बदलून जातो.
खिडकीची काच पुसण्यासाठी- खिडक्यांच्या काचावर धूळ बसत असते. तेव्हा खिडक्यांच्या काचा स्वच्छ करण्यासाठी कार्पेटच्या तुकडय़ाचा वापर करता येतो.
वॉल हँगिंग- भिंती सजवण्यासाठी आपण कधी कधी एखादं पेंटींग्ज लावतो. पेंटिंग्ज थोडं महागडं असतं. अशावेळेला आपल्याकडील जुन्या कार्पेटचा वॉल हँगिंग म्हणून सुरेख वापर करता येतो.