13 वर्षांच्या वाटचालीनंतरही रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाला अद्याप पहिल्याच जेतेपदाची प्रतीक्षा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कर्णधार विराट कोहलीवर व महान फलंदाज एबी डीव्हिलियर्स यांच्यावरच अधिक अवलंबून रहात आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरला आजवर एकदाही आयपीएल स्पर्धा जिंकता आलेली नसून यंदा तरी ते हा जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणू शकणार का, याची चाहत्यांना उत्सुकता असेल. यंदा त्यांनी लिलावापूर्वी 10 खेळाडूंना मुक्त करत काही नवे खेळाडू करारबद्ध केले आहेत. आता नशिबाचा कौल देखील बदलेल, अशी त्यांना अपेक्षा असणार आहे.
आरसीबीचा संघ समतोल असत नाही, असे मागील कित्येक हंगामात दिसून आले असून याचा त्यांना फटकाही सोसावा लागला आहे. विविध खेळाडूंच्या दुखापती व विराट-एबीडीवर अधिक अवलंबून राहिल्याचे तोटेही त्यांनी सोसले आहेत. वास्तविक, मागील हंगामात त्यांनी आक्रमक सुरुवात जरुर केली होती. पण, स्पर्धेच्या निर्णायक टप्प्यात त्यांचा फॉर्म अचानक गडगडला आणि सलग 5 सामने गमवावे लागल्यानंतर एलिमिनेटरमध्ये त्यांचे आव्हान संपुष्टात आले होते.
यंदा लिलावापूर्वी त्यांनी संघातील 10 खेळाडूंना मुक्त करत संघाची नव्याने जडणघडण करण्यावर भर दिला. हा संघ मंदगती गोलंदाजीवर अधिक अवलंबून रहात आला असून साहजिकच, चेन्नई व अहमदाबादमधील खेळपट्टीवर त्यांचा खेळ अधिक बहरु शकतो. लेगस्पिनर यजुवेंद्र चहल या लीग स्पर्धेत बराच यशस्वी ठरत आला असून यंदाही गोलंदाजीत त्याच्याकडून चमत्काराची अपेक्षा आहे. चहलला या हंगामात बराच अचूक मारा करत आलेल्या ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरची साथ असेल. मागील हंगामात विशेषतः पॉवर प्ले षटकात विराटने वॉशिंग्टन सुंदरवरच अधिक विश्वास दर्शवला होता.
चहल व सुंदर यांच्याबरोबर मॅक्सवेलकडून देखील काही षटके गोलंदाजी करवून घेता येण्यासारखे आहे. मॅक्सवेलने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तसेच बिग बॅश लीग स्पर्धेत लक्षवेधी योगदान दिले आहे. याशिवाय, आरसीबीकडे ऑस्ट्रेलियन ऍडम झाम्पाचा पर्यायही उपलब्ध असणार आहे.
आरसीबीची जलद गोलंदाजी कमकुवत
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाची जलद-मध्यमगती गोलंदाजी लाईनअप अतिशय कमकुवत आहे आणि ही त्यांची मुख्य चिंता आहे. नवदीप सैनी व मोहम्मद सिराज यांना मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजीचा फारसा अनुभव नाही आणि त्यांचे स्पेल बरेच महागडे ठरतात, असा पूर्वानूभव आहे. काईल जेमिसनचा पर्याय उपलब्ध असला तरी तो टी-20 क्रिकेटमध्ये बराच झगडत आला आहे. शिवाय, त्याला भारतात खेळण्याचा अनुभवही नाही. या संघाकडे याशिवाय, हर्षल पटेल तसेच ऑस्ट्रेलियन त्रिकूट ख्रिस्तियन, डॅनिएल सॅम्स व केन रिचर्डसन यांचे पर्याय उपलब्ध आहेत.
आरसीबी संघ ः विराट कोहली (कर्णधार), एबी डीव्हिलियर्स, देवदत्त पडिक्क्ल, यजुवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, केन रिचर्डसन, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे, फिन ऍलन, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, ऍडम झाम्पा, काईल जेमिसन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, सचिन बेबी, मोहम्मद अझरुद्दीन, डॅनिएल ख्रिस्तियन, केएस भरत, सुयश प्रभुदेसाई, डॅनिएल सॅम्स, हर्षल पटेल.
ही आहे आरसीबीची मजबुतीची बाजू
आरसीबीची फलंदाजी लाईनअप कागदावर बरीच मजबूत आहे. रनमशिन विराट कोहलीने आपण सलामीला उतरणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. शिवाय, त्याच्या साथीला देवदत्त पडिक्कलसारखा बहरातील युवा, गुणवान फलंदाज मैदानात उतरणार आहे. युवा यष्टीरक्षक-फलंदाज मोहम्मद अझरुद्दीनने सय्यद अली मुश्ताक चषक स्पर्धेत 194.54 चा झंझावाती स्ट्राईक रेट नोंदवला असून तो येथे लक्षवेधी योगदान देऊ शकतो. न्यूझीलंडचा फिन ऍलेन आघाडीला आक्रमक पर्याय असेल. शिवाय, मध्यफळीत एबी डीव्हिलियर्स, मॅक्सवेल, सचिन बेबी, डॅनिएल ख्रिस्तियन, वॉशिंग्टन सुंदर असे अव्वल खेळाडू समाविष्ट आहेत.
बिग हिटर्स मदतीला धावून येण्याची अपेक्षा
आरसीबी संघात डीव्हिलियर्स, मॅक्सवेल, विराट यांच्यासारखे अव्वल फलंदाज असून ही बाब विशेषतः धावांचा पाठलाग करत असताना अधिक उपयुक्त ठरु शकते. यापैकी मॅक्सवेलला बहरात परतण्यासाठी ही स्पर्धा अधिक महत्त्वाची असेल. मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियन संघातर्फे मॅचविनर म्हणून बराच नावलौकिक प्राप्त केला आहे. पण, तीच किमया त्याला आयपीएलमध्ये मात्र साधता आलेली नाही. यंदा मिळालेल्या संधीचा लाभ घेण्याचा त्याचा पुरेपूर प्रयत्न असेल.