बार्टी, शापोव्हॅलोव्ह, जोकोविच, प्लिस्कोव्हाही शेवटच्या आठ खेळाडूंत, स्वायटेक, क्रेज्सिकोव्हा यांना पराभवाचा धक्का
वृत्तसंस्था/ विम्बल्डन
टय़ुनिशियाच्या ऑन्स जेबॉरने विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम ठेवत एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असून तिने पोलंडच्या पेंच ओपन विजेत्या इगा स्वायटेकचे आव्हान संपुष्टात आणले. एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत इथवर मजल मारणारी जेबॉर ही अरब देशातील पहिली महिला टेनिसपटू आहे. बेलारुच्या द्वितीय मानांकित एरीना साबालेन्कानेही उपांत्यपूर्व फेरी गाठली असून तिने रिबाकिनाचा पराभव केला. याशिवाय इटलीचा मॅटेव बेरेटिनी, जोकोविच, खचानोव्ह, शापोव्हॅलोव्ह, ऍश्ले बार्टी, कॅरोलिना प्लिस्कोव्हा यांनीही शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले आहे. मिश्र दुहेरीत पत्नीसमवेत खेळणाऱया भारताच्या दिविज शरणचे आव्हानही दुसऱया फेरीत समाप्त झाले. या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपासून पूर्ण क्षमतेने प्रेक्षकांना प्रवेश देण्याचा निर्णय आयोजकांनी जाहीर केला आहे.
21 व्या मानांकित जेबॉरने सातव्या मानांकित स्वायटेकला 5-7, 6-1, 6-1 असा पराभवाचा धक्का देत आगेकूच केली. मी ड्रॉप शॉट्सचा सढळ वापर करते याची सर्वांना माहिती आहे. त्यासाठी या सामन्यात आपल्या खेळात थोडा बदल करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय या सामन्यात आक्रमक खेळणेही तितकेचे गरजेचे होते, असे जेबॉर सामन्यानंतर म्हणाली. तिने या सामन्यात सर्व ब्रेकपॉईंट्सवर गुण मिळविले. पहिला सेट गमविल्यानंतर मात्र तिने मागे वळून पाहिले नाही. तिची पुढील लढत साबालेन्काशीच होणार आहे. साबालेन्काने चौथ्या फेरीच्या लढतीत कझाकच्या इलेना रिबाकिनावर 6-3, 4-6, 6-3 अशी मात करीत ग्रँडस्लॅम स्पर्धेत पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरी गाठली. रिबाकिनाने या स्पर्धेआधी आपल्या सर्व्हिस गेम्सवर स्पर्धा जिंकली होती. पण या सामन्यात तिला त्याची पुनरावृत्ती करता आली नाही. साबालेन्काचा आत्मविश्वासही हळूहळू वाढत गेला आणि दोन बिनतोड सर्व्हिस करीत 4-2 अशी आघाडी घेतली. रिबाकिनाने डबल फॉल्ट केल्यानंतर साबालेन्काने हा सेट जिंकला. साबालेन्काने यावर्षी अबुधाबीतील स्पर्धेत तसेच 2019 मध्ये वुहानमधील स्पर्धेत रिबाकिनाला हरविण्यासाठी तीन सेट्स घेतले होते. त्याचीच पुनरावृत्ती येथेही झाले. दुसऱया सेटमध्ये रिबाकिनाने खेळ उंचावत हा सेट जिंकून बरोबरी साधली. निर्णायक सेटमध्येही रिबाकिनाने 3-3 अशा बरोबरीपर्यंत वर्चस्व ठेवले होते. यानंतर साबालेन्काने खेळ उंचावला आणि सेटसह सामना जिंकून आगेकूच केली.
बार्टी, प्लिस्कोव्हाची आगेकूच
महिलांमध्ये अग्रमानांकित ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले बार्टीनेही पहिल्यांदाच या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली असून तिने पेंच ओपन विजेत्या बार्बरा क्रेज्सिकोव्हाचे आव्हान संपुष्टात आणले. बार्टीने ही लढत 7-5, 6-3 अशी जिंकली. आठव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हानेही शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविताना लुडमिला सॅम्सोनोव्हावर 6-2, 6-3 अशी मात केली.
बेरेटिनी विजयी
पुरुष एकेरीत इटलीच्या सातव्या मानांकित बेरेटिनीने उपांत्यपूर्व फेरी गाठताना बेलारुसचा पदार्पणवीर इलया इव्हाश्कावर 6-4, 6-3, 6-1 असा सफाईदार विजय मिळविला. या स्पर्धेत एकाच आवृत्तीत दुहेरी मुकुट साधणारे काही निवडक खेळाडू आहेत, त्यात स्थान मिळविण्याच्या दिशेने बेरेटिनीने आगेकूच केली आहे. यापूर्वी जॉन मॅकन्रो, बोरिस बेकर, पीट सांप्रास, राफेल नदाल, अँडी मरे यांनी असा पराक्रम केला आहे. विम्बल्डनची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा बेरेटिनी हा गेल्या 23 वर्षातील पहिला इटालियन खेळाडू आहे. त्याची पुढील लढत जर्मनीचा चौथा मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्ह किंवा सोळावा मानांकित कॅनडाचा फेलिक्स ऑगर ऍलियासिमे यापैकी एकाशी होणार आहे.
जोकोविच, शापोव्हॅलोव्ह विजयी
सोमवारी झालेल्या अन्य सामन्यात कॅरेन खचानोव्हने सेबॅस्टियन कोर्दाचा पाच सेट्सच्या मॅरेथॉन लढतीत 3-6, 6-4, 6-3, 5-7, 10-8 असा पराभव केला. अग्रमानांकित नोव्हॅक जोकोविचनेही आगेकूच केली असून त्याने 17 व्या मानांकित क्रिस्तियन गॅरिनवर 6-2, 6-4, 6-2 अशी मात केली तर कॅनडाच्या दहाव्या मानांकित डेनिस शापोव्हॅलोव्हने स्पेनच्या आठव्या मानांकित रॉबर्टो बॉटिस्टा ऍगटचा 6-1, 6-3, 7-5 असा पराभव केला.
दिविज-समंथा दुसऱया फेरीत पराभूत
मिश्र दुहेरीत भारताचा दिविज शरण पत्नी समंथा मरेसमवेत खेळत होता. त्यांनी पहिली फेरी जिंकून यशही मिळविले होते. मात्र दुसऱया फेरीत त्यांना रॅव्हेन क्लासेन व दारिया जुराक यांच्याकडून 6-3, 7-6, 6-3 असा पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.