भाजप आमदाराच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ऑनलाईन टीम/तरुण भारत
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा रंग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सत्ताधारी भाजप आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तर समाजवादी पक्ष भाजपला सत्तेवरून खाली खेचून आपण सत्तेत उत्सुक असून त्यासाठी अखिलेश यादव ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर काँग्रेसही प्रियांका गांधींच्या नेतृत्वाखाली जोरदार मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे. उत्तर प्रदेशात रविवारी निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडला. ५९ जागांसाठी ६५ टक्के मतदान झाले आहे. आतापर्यंत समाजवादी पार्टीचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. तर कर्नाटकातील हिजाबचा वादाचे पडसाद जगभरात उमटत असताना भाजप देशात जातीय राजकारण करत असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत असताना उत्तर प्रदेशातील मभजप आमदाराने एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जे हिंदू मला मत देणार नाहीत, त्यांच्या नसात मुस्लिमांचे रक्त आहे, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे आमदार राघवेंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. एका प्रचारसभेत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. राघवेंद्र सिंह हे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवत आहेत.
यासंदर्भात इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सिंह म्हणाले की, “मी पाच दिवसांपूर्वी हे वक्तव्य केलं होतं. परंतु ते दुसऱ्या संदर्भात होतं आणि कोणालाही धमकावण्याचा माझा हेतू नव्हता”. व्हिडिओमध्ये आमदार अपशब्द वापरताना ऐकू येत आहेत. ते म्हणतात, “मला सांगा, कोणी मुस्लिम मला मत देईल का? तेव्हा लक्षात ठेवा की या गावातील हिंदूंनी माझ्याऐवजी दुसऱ्याचे समर्थन केले तर त्यांच्या नसात मुस्लिम रक्त आहे. ते देशद्रोही आहेत. इतके अत्याचार करूनही जर हिंदू तिकडे गेला तर त्याने लोकांसमोर आपले तोंड दाखवू नये.”