ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना लसीच्या चाचणीमध्ये सहभागी झालेले काही स्वयंसेवक अचानक आजारी पडल्याने अमेरिकेतील जॉन्सन अॅन्ड जॉन्सन कंपनीने आपल्या कोरोना लसीच्या चाचण्या काही काळासाठी थांबवल्या आहेत.
जॉन्सन अॅन्ड जॉन्सनने कोरोनावर Ad26.COV2.S ही लस तयार केली आहे. विशेष म्हणजे कोरोनापासून बचाव करण्यासाठी या लसीचा एक डोस पुरेसा आहे. या लसीचा एक डोस दिल्यानंतर स्वयंसेवकांमध्ये कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे. स्वयंसेवकांनी दोन डोस घेतल्यानंतरही त्यांच्या शरीरात कोणतेही दुष्परिणाम आढळून आले नाहीत. त्यामुळे ही लस कोरोनावर अत्यंत प्रभावी समजली जात आहे.
मात्र, काही स्वयंसेवक आजारी पडल्याने लसीची चाचणी काही काळ थांबवण्यात आली आहे. ही रुटीन स्थगिती असून, संबंधित व्यक्तींच्या आजारपणाबद्दल माहिती नसल्याने तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, अमेरिकेत मॉर्डना, पीफायझर या कंपन्यांनी विकसित केलेल्या लसीच्याही चाचण्या सुरू आहेत.