वार्ताहर / जोतिबा डोंगर
जोतिबाच्या दर्शनासाठी येणाऱया भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी दर्जेदार विकास कामे करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना श्रींच्या दर्शनासाठी घेऊन येणार आहे. असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
मंत्रीपद मिळाल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी रविवारी जोतिबा डोंगर येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी ग्रामपंचायत, ग्रामस्थ, पुजारी व देवस्थान समिती यांच्यावतीने त्यांचा शाल, फेटा देऊन सत्कार करण्यात आला.
मंत्री हसन मुश्रीफ मंदिर परिसरात येताच ग्रामपंचायत सरपंच राधा बुणे उपसरपंच शिवाजीराव सांगळे, ग्रामपंचायत सदस्य, देवस्थानचे इन्चार्ज ऑफीसर महादेव दिंडे, पन्हाळय़ाचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक आसिफ मोकाशी, राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर) यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी मोठी आतिषबाजी करून मंत्री मुश्रीफ यांना फेटा बांधून शाल, श्रीफळ देऊन श्री च्या मंदिरात नेण्यात आले. यावेळी त्यांनी धार्मिक विधी करुन श्रीच्या चरणी नतमस्तक झाले. यावेळी श्रें च्या मंदिरात पुजारी व ग्रामस्थ यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर सर्व देवांचे दर्शन घेऊन, मंदिर प्रदक्षिणा काढून मंदिर परिसराची पाहणी केली.
यावेळी जोतिबा डोंगरचे उपसरपंच शिवाजीराव सांगळे यांनी परिसरात सुरु असलेल्या विकास कामाबद्दल माहिती दिली. तसेच चुकीच्या पद्धतीने सुरु असलेल्या कामांची माहितीही त्यांना दिली. यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, ग्रामपंचायतमार्फत एक पत्र द्या त्यानंतर यासाठी एक मिटींग लावू व चुकीच्या पद्धतीने चाललेले काम आपण थांबवू असे ते म्हणाले. तसेच जोतिबाच्या विकासासाठी आपण सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी पोलीस पाटील बाळासो पाटील , नवनाथ लादे, निवास ढोली,राष्ट्रवादीचे जोतिबा परिसरातील कार्यकर्ते , देवस्थान स्टाफ ग्रामपंचायत सदस्य लखन लादे. ग्रामस्थ, भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.