प्रतिनिधी / जोयडा
जोयडा तालुक्यातील दोन रस्त्यांसाठी 15 कोटी 79 लाख रुपये मंजूर झाले आहे. माजी मंत्री व विद्यमान आमदार आर. व्ही. देशपांडे यांच्या प्रयत्नामुळे निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती रामनगर जि.पं. सदस्य संजय हणबर यांनी जोयडा ता.पं. उपाध्यक्ष कार्यालयात दिली.
देवळी लोहारवाडा ते चांदेवाडी मेनरोड व्हाया कोनशेत 5 कि.मी. साठी 4 कोटी 68 लाख रुपये प्रधानमंत्री सडक ग्राम योजना अंतर्गत मंजूर झाले आहेत. कॅसरलॉक ते बाजारकुणंग 14.46 कि.मी.साठी 11 कोटी 11 लाख रुपये डांबरीकरण करण्यासाठी राज्य रस्ते अभिवृद्धी योजनेंतर्गत मंजूर झाले आहेत. असे एकूण 15 कोटी 79 लाख मंजूर केले आहेत. रस्ते अभिवृद्धी, पिण्याचे पाणी, शेतीसाठी बंधारे राबविण्यात येत आहेत, असे जि. पं. सदस्य संजय हणबर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. जोयडा ता. पं. उपाध्यक्ष विजय पंडित म्हणाले, जोयडा तालुक्यात रस्ते विकासामुळे पर्यटनास चालना मिळालेली आहे. पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत आहे. आणखी स्थळांचा विकास व्हावा म्हणून माजी मंत्री व विद्यमान आमदार यांच्याकडे निवेदन सादर केले आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी जगलबेट भागाचे ता. पं. सदस्य बळवंत देसाई उपस्थित होते.