कंग्राळी बुद्रुक येथील मराठी प्राथमिक शाळेच्या भूमिपूजन समारंभप्रसंगी व्यक्त केले मनोगत
वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
ज्ञानमंदिरामध्ये मुलांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल होते तर मंदिरामध्ये धार्मिकता व हिंदू संस्कृतीचे भविष्य उज्ज्वल होते. यासाठी मंदिराबरोबर ज्ञानमंदिराकडे अधिक लक्ष देऊन भावी पिढीचे शैक्षणिक आयुष्य भक्कम करण्याचे कार्य करावे, असे मनोगत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले.
कंग्राळी बुद्रुक येथे माजी विद्यार्थी संघटना व ग्रामस्थांतर्फे बांधण्यात येत असलेल्या सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचा भूमिपूजन कार्यक्रम रविवारी उत्साहात पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बांधकाम कमिटीचे अध्यक्ष मारुती भैरू अष्टेकर होते.
व्यासपीठावर ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, ग्रा. पं. अध्यक्षा संध्या चौगुले, ता. पं. अध्यक्ष शंकरगौडा पाटील, ता. पं. सदस्या लक्ष्मी मेत्री, जि. पं. उपाध्यक्ष अरुण कटांबळे, हिंडाल्कोचे अधिकारी विश्वास शिंदे, माजी नगरसेविका जयश्री माळगी, शाळेचे मुख्याध्यापक ए. वाय. शहापूरकर, निवृत्त मुख्याध्यापक डी. जी. खन्नुरकर, निवृत्त शिक्षक जैनापुरे, हभप कल्लाप्पा हुरुडे, सामाजिक कार्यकर्ते बसवराज कक्कण्णावर, हिंडाल्कोचे रवि बिसगुप्पी आदी उपस्थित होते.
हेब्बाळकर पुढे म्हणाल्या, सध्या कोरोनाच्या महामारीमुळे सरकारकडे फंड कमी आहे. तरीसुद्धा या शाळेसाठी सहा खोल्यांचा निधी मंजूर करून देण्याचे आश्वासन देत शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी या अडीच वर्षाच्या कामामध्ये जवळजवळ 220 शाळा खोल्या मंजूर करून 31 कोटी रुपये मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी बांधकाम कमिटी अध्यक्ष मारुती अष्टेकर यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजन केले. यावेळी विश्वास शिंदे व शंकरगौडा पाटील यांनी दीपप्रज्वलन केले. संध्या चौगुले व लक्ष्मी मेत्री यांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन करण्यात आले. अरुण कटांबळे व शंकरगौडा पाटील यांनी शिवप्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर आमदार हेब्बाळकर यांच्या हस्ते विधिवत पूजा करून शाळा कामाचे भूमिपूजन करण्यात आले….
यावेळी शाळा सुधारणा महिला सदस्यांच्या हस्ते आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नूतन ग्रा. पं. महिला व पुरुष सदस्यांचा सत्कार करण्यात आला. राजकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले.
सर्वांनी सढळ हस्ते मदत करून सहकार्य करण्याचे आवाहन ऍड. सुधीर चव्हाण यांनी केले. यावेळी अरुण कटांबळे व मारुती अष्टेकर यांनीसुद्धा मराठी माध्यम शाळेचे महत्त्व या माध्यमामधून शाळा आदर्शवत ठरणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात मराठी शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य, बांधकाम कमिटी सदस्य, आजी-माजी विद्यार्थी, शिक्षकवृंद व ग्रामस्थ उपस्थित होते. शंकर कोनेरी व पुंडलिक पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सदानंद चव्हाण यांनी आभार मानले.
यावेळी खालील मान्यवरांनी देणग्या दिल्या. तानाजी मिनू पाटील 40,450 रु., ए. वाय. शहापूरकर व संध्या उमेश चौगुले यांच्याकडून प्रत्येकी 11,000 रु., जयराम विठ्ठल पाटील 10,000 रु, कल्लाप्पा कडोलकर, डी. जी. खन्नुरकर, मनोहर बाबू कडोलकर, हणमंत पुजारी, निता मारुती पाटील प्रत्येकी 5000 रु., शकुंतला सिंग 5000, शांता चंद्राप्पा व्हन्नप्पण्णावर, भारता भाऊराव पाटील, जैनापुरे सर प्रत्येकी 2000 रु, हभप भरमा गावडू पाटील 1000 रुपये या प्रमाणे देणग्या देण्यात आल्या.