आर्थिक गुन्हा विरोधी विभागाकडे तक्रार : सहा संशयितांच्या विरोधात गुन्हा नोंद
प्रतिनिधी /पणजी
दर महिन्याला पाच टक्के व्याजदर देण्याच्या नावाखाली 29 लाख रुपयांची अफरातफर केल्याची घटना घडली असून याप्रकरणी पोलीस खात्याच्या आर्थिक गुन्हा विरोधी विभागाने सहा संशयितांच्या विरोधात भादंसंच्या 406, 409, 420 व 120 कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणात अनेक ठेवीदारांचे पैसे अडकले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
संशयितांमध्ये सुभाष पाटील (38 वर्षे, कोल्हापूर), पॅनुटे डिसोझा (49 वागातोर बार्देश), नितीन बांदोडकर (40 धारगळ पेडणे), डेल्सी बॅगरेन (30 मडगाव), मारिया ईवुनीया (63 कळंगुट) व दिगंबर यांचा समावेश आहे.
एफएक्सपी लिमिटेड कंपनीने पर्वरी येथे कार्यालय सुरु केले होते. ठेवीदरांना दर महिन्याला पाच टक्के व्याज देण्याचे आश्वासन दिले होते. संशयितांनी कंपनीच्या नावाखाली तब्बल 29 लाख रुपये ठेविदारांकडून जमा पेले होते. कित्येक महिने झाले तरी ठेवीदारांना व्याज मिळत नसल्याने ठेवीदार कंपनीच्या कार्यालयात चौकशी करणयासाठी गेले असता कार्यालय बंद असल्याचे आढळून आले. तेव्हा ठेवीदारांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी आर्थिक गुन्हा विरोधी विभागाकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी याबाबत तपास कामाला सुरुवात केली असता महिन्याला पाच टक्के व्याज देण्याचे आश्वासन देणारी कंपनीच बनावट असल्याचे उघड झाले आहे. तसेच संशयितांनी ठेवीदारांकडून घेतलेले पैसे कंपनीत भरलेच नसून ते पैसे स्वतःसाठी वापरल्याचे उघड झाले आहे. आर्थिक गुन्हा विरोधी विभाग पुढील तपास करीत आहेत.