बेळगाव जिल्हा स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघ आणि जिल्हा स्वातंत्र्यसैनिक गृहनिर्माण संघाच्यावतीने बुधवार दि. 22 डिसेंबर रोजी वयाची शंभरी पार केलेल्या स्वातंत्र्यसैनिक श्री राजेंद्र कलघटगी यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. मराठा मंदिराच्या सभागृहात संपन्न होणाऱया या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा हे उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी कर्नाटक शासनाचे माजी दिल्ली प्रतिनिधी शंकरगौडा पाटील हे राहणार आहेत. याप्रसंगी जिल्हय़ातील अनेक आजी-माजी आमदार उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त कलघटगी यांचा अल्प परिचय.
27 ऑक्टोबर 1920 रोजी जन्मलेल्या आणि केवळ चौथीपर्यंत शिकलेल्या राजेंद्र कलघटगी यांनी बेळगावात आल्यानंतर वडिलांना व्यवसायात मदत केली. ऐन तारुण्यात म्हणजे 1942 साली महात्मा गांधीजी यांनी जाहीर केलेल्या चलेजाव चळवळीत त्यांनी भाग घेतला. इंग्रज सरकारविरुद्ध पत्रके छापून ती वाटण्याचे काम ते करीत असताना त्यांना पकडण्यात आले आणि 25 एप्रिल 1943 रोजी त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या समवेत सिद्धाप्पा होनगेकर, बडसचे बी. आर. पाटील, बैलहोंगलचे बिशनकोप, दोदवाडचे कती व इतर अनेक स्वातंत्र्यसैनिक होते. तिथून त्यांची सात महिन्यानंतर 20 नोव्हेंबर 1943 रोजी सुटका करण्यात आली.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी स्वतःच्या चित्रपट प्रदर्शन व्यवसायात पदार्पण केले. श्यामची आई, मै कृष्णा हूँ, प्रचंड फुटानीगळू सिंहद मरी सैन्य, बेटद हू यासारख्या मराठी, कानडी व हिंदी बाल चित्रपटांचे विविध टॉकिजमध्ये प्रदर्शन केले. याशिवाय बन्या बापू, अष्टविनायक, कुर्बानी, राजा शिवछत्रपती व थांब लक्ष्मी कुंकू लावते यासारखे अनेक चित्रपट बेळगाव जिल्हय़ाच्या विविध भागात प्रदर्शित करून व्यवसायात प्रचंड प्रगती केली. सुमारे 23 वर्षे हा व्यवसाय केल्यानंतर त्यांनी पुढील 17 वर्षे हॉलमध्ये व शाळांमध्ये जाऊन चित्रपटांचे प्रदर्शन केले.
बेळगावात स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे एक स्मारक व्हावे यासाठी अनेक वर्षे प्रयत्न करून त्यांनी स्वातंत्र्यसैनिक भवनाची उभारणी करण्यासाठी प्रयत्न केले. त्यातूनच स्वातंत्र्यसैनिक संघटना उभा राहिली आज या संघटनेचे भव्य भवन गोगटे कॉलेज समोर उभा राहिले आहे आणि या संघटनेचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते 2016 मध्ये कलघटगी यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आले. तर 2020 मध्ये तत्कालीन खासदार सुरेश अंगडी व इतरानी त्यांचा सन्मान केला. गेल्या नऊ ऑगस्ट रोजी बेळगावचे जिल्हाधिकारी आणि इतरांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना सन्मानित केले. अनेक ठिकाणी सन्मानित करण्यात आलेल्या श्री राजेंद्र कलघटगी यांनी वयाची एकशे एक वर्षे पूर्ण केली असून आजही त्यांची तब्येत ठणठणीत आहे. आजही स्वतः स्कूटरवरून ते फिरतात. त्यांना एक मुलगा, दोन मुली, बारा नातू आणि आठ पणतू अशी वंशावळ लाभली असून त्या सर्वांच्या मध्ये ते चन्नम्मानगरामध्ये गुण्यागोविंदाने राहतात.
या देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी तरुण पिढीने पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी बालपणापासूनच मुलांच्या मनात देशभक्ती निर्माण होण्याची गरज आहे. याकरिता प्राथमिक शाळेपासूनच अभ्यासक्रमात देशभक्तीचा समावेश केला जावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
आज स्वातंत्र्यसैनिक पदाधिकारी संघ, स्वातंत्र्य सैनिक गृहनिर्माण संघटना व भारत सेवा दल जिल्हा समितीतर्फे त्यांचा भव्य सत्कार होत आहे. त्यांच्या कार्यास शुभेच्छा!
-अनंत लाड, बेळगाव