ऑनलाईन टीम / मुंबई :
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री शशिकला यांचे आज दुपारी 12 वाजता मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. त्या 88 वर्षांच्या होत्या. शशिकला यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.
शशिकला यांचे पूर्ण नाव शशिकला जावळकर असे होते. 4 ऑगस्ट 1932 सोलापूरात एका सधन कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना नृत्य आणि अभिनयाची आवड होती. 1947 च्या जुगणू चित्रपटात दिलीप कुमार यांच्या बहिणीची भूमिका त्यांनी साकारली होती. मात्र, यानंतर त्यांना सिनेमात काम मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. 1962 साली आरती चित्रपटात त्यांना खलनायिकेची भूमिका मिळाली. खलनायिकेच्या या भूमिकेनेच त्यांच्या जिवनाला कलाटणी मिळाली.
जंगली, कभी खुशी कभी गम, हरियाली और रास्ता, गुमराह, हमराली, फुल और पत्थर, नौ दो ग्यारह, कानून, अनपढ, देवर, अनुपमा यासह शंभराहून अधिक चित्रपटात त्यांनी काम केले. वयाच्या 20 व्या वर्षी ओमप्रकाश सहगल यांच्यासोबत त्यांनी प्रेमविवाह केला. त्यांना दोन मुली आहेत.