वास्तवदर्शी चित्रकार हरपला ः पुण्यात 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पुणे / प्रतिनिधी
वास्तवदर्शी चित्रकार अशी ओळख असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तसेच भारतीय चित्रकलेला जागतिक ओळख देणारे जगप्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे यांचे अल्पशा आजाराने शनिवारी दुपारी साडेबारा वाजता पुण्यात निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे. वास्तुशिल्पशास्त्र, प्रकाशन, जाहिरात या क्षेत्रात त्यांनी काम केले.
मेंदुमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे परांजपे यांना 30 मे रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वयोमानामुळे त्यांची प्रकृती उपचारांना प्रतिसाद देत नव्हती. शनिवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. परांजपे यांचे पार्थिव दुपारी मॉडेल कॉलनी येथील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी चित्रकार चारुहास पंडित, अनिल उफळेकर, श्रीकांत प्रधान, नगरसेविका जोस्ना सरदेशपांडे आदी उपस्थित होते.
परांजपे यांचा जीवनपट
परांजपे यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1935 बेळगाव येथे झाला. त्यांच्या घरातच कलेचा वारसा होता. लहानपणी ते अभ्यासापेक्षा रंगांमध्येच रमायचे. वयाच्या पाचव्या वषी त्यांच्या वडिलांनी हातात कुंचला दिला. पुढे चित्रकलेचे उच्चशिक्षण त्यांनीं बेळगाव येथील के. भी. कुलकर्णी यांच्या चित्रमंदिर तसेच जे जे स्कूल ऑफ आर्टमधून पूर्ण केले. त्यांच्या करियरची सुरुवात टाइम्स ऑफ इंडिया मधील नोकरीने झाली. तेथे ते जाहिरातींसाठी इल्युजन करायचे. नंतर रवी परांजपे यांनी प्रकाशन, जाहिरात, वास्तुशिल्पशास्त्र या क्षेत्रांत काम केले. त्यांनी नैरोबी, केनिया मध्येही काम केले. 1990 साली ते पुण्यात स्थायिक झाले. तेथे त्यांनी मोठा स्टुडिओ उभारला. ते एक उत्तम चित्रकार होतेच, शिवाय एक चांगले कला समीक्षक, लेखक होते, आणि यापलीकडे जाऊन ते सामाजिक जाणीव असलेले एक नागरिकही होते. त्यांचे ‘ब्रश मायलेज’ हे आत्मकथन तसेच परदेशी चित्रकारांचा परिचय करून देणारे ‘शिखरे रंग-रेषांची’ हे पुस्तक गाजले. ‘नीलधवल ध्वजाखाली’ हे लेखसंग्रहावर आधारित पुस्तक प्रकाशित झाले आहे.
कारकीर्द
1960 च्या दशकापासून उपयोजित बोधचित्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या स्वतंत्र चित्रशैलीचा ठसा परांजपे यांनी उमटविला. उत्कृष्ट रेखांकन व आपल्या अनोख्या रंगभानाने स्वातंत्र्योत्तर भारतातील बोधचित्रकारितेला त्यांनी एका वेगळय़ाच उंचीवर नेऊन ठेवले. 60 वर्षांच्या या प्रदीर्घ चित्रकारकीर्दीत त्यांनीं उपयोजित कलेबरोबरच अभिजात पेन्टींगच्या क्षेत्रातही भरीव योगदान दिले आहे. ज्यात परंपरेचा डोळस अभ्यास, दर्जेदार रेखांकन, पारंपरिक रंगमाध्यमांचा वैशिष्टय़पूर्ण वापर, भारतीय पांरपारिक व लोककलांचे प्रतिबिंब दिसते. या अभ्यासाला त्यांनी स्वशैली व ब्रिटीश वास्तववादी कलेचा संदर्भ दिला.
रवी परांजपे यांनी अनेक जागतिक कीर्तीच्या नियतकालिकांमधून संशोधनपर लेखन केले. नवचित्रकलेच्या प्रवाहाच्या विरुद्ध ठामपणे उभे राहून त्यांनी अभिजात शैलीचा पाठपुरावा केला. सशक्त रेषा, सोपी आणि ओघवती मांडणी, त्रिमिती दाखवण्याचे वेगळे कसब, वेगवेगळे पोत कुंचल्यातून साकारण्याची ताकद त्यांच्या चित्रात दिसत असे. दृश्य वास्तवाला दिलेला भावनिक प्रतिसाद परांजपे यांनी निर्मिलेल्या कलाकृतींमधून दिसतो. त्यामुळे त्यांचे रंग, ते हाताळण्याची पद्धत वैशिष्टय़पूर्ण होती. अनेक वर्षांच्या चित्रसाधनेतून त्यांनी ती विकसित केली.
मिळालेले पुरस्कार
परांजपे यांच्या या अभूतपूर्व कलाकर्तृत्त्वावर अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांची मोहोर उमटली आहे. ‘कम्युनिकेशन आर्ट्स गिल्ड’चा (कॅग) ‘हॉल ऑफ फेम’ हा जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला असून, त्यांच्या ‘द ग्रीन एकोज’ या निसर्गचित्राला 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. दयावती मोदी प्रति÷ानतर्फे दयावती मोदी हा कला क्षेत्रातील पुरस्कार लाभला आहे. महाराष्ट्र राज्य जीवनगौरव पुरस्कार, अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्टस, तसेच ‘ब्रश मायलेज’ या पुस्तकासाठी भैरूरतन दमाणी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे, तर पेन्टींग क्षेत्रातील ‘द बॉम्बे आर्ट सोसायटी’तर्फे रूपधर हा चित्रकला क्षेत्रातील प्रति÷sच्या जीवनगौरव पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला. उपयोजित व पेन्टींग अशा दोन्ही क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळविणारे ते एकमेव चित्रकार ठरलेआहेत.
राष्ट्रनिर्मितीला हातभार
स्वतःच्या चित्रनिर्मितीबरोबरच त्यांनी राष्ट्रवाद, सौंदर्यदृष्टीचा व्यापक वापर, राष्ट्रनिर्मितीला कसा हातभार देऊ शकतो, यावर चिंतनात्मक लेखन केले तसेच कलाविषयक लेखनाचे ‘शिखरे रंग रेषांची’ आणि आत्मवृत्त ‘ब्रश मायलेज’ या त्यांच्या पुस्तकांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत. चित्रकलेतील अनेक विषयांवरील त्यांची पुस्तके, पुढील पिढीसाठी संचित आहे. त्यांनी रवी परांजपे फाउंडेशन स्थापन करून त्या माध्यमातून ज्येष्ठ गुणिजन कलाकार तसेच तरुण कलाकारांना पुरस्कृत केले आहे. तसेच, चित्रकला, संगीत, शिल्पकला क्षेत्रासाठी कलाकारांना मार्गदर्शन तसेच शिष्यवृत्ती स्वरुपात भरीव योगदान केले.
ं