प्रकृती अस्वास्थ्यामुळे गोमेकॉत सुरु होते उपचार
प्रतिनिधी /धारबांदोडा
गोव्यातील ज्येष्ठ मराठी साहित्यिक व समीक्षक पुंडलिक शिवराम उर्फ पु. शि. नार्वेकर (96) यांचे काल रविवारी सकाळी 6 वा. बांबोळी येथील गोमेकॉत निधन झाले. नार्वेकर हे धारबांदोडा तालुक्यातील कुळे गावातील असून साहित्य क्षेत्रात कथाकार म्हणून ते प्रसिद्ध होते. कुळे गावातच राहून त्यांनी विपुल असे लेखन केले. सन 2009 साली माशेल येथे भरलेल्या अखिल गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते आणि पेडणे येथे 28 वे मराठी साहित्य संमेलन सुरु असतानाच सरस्वतीच्या या उपासकाने आपला देह ठेवला.
विघ्नहर्ता, मृगजळ, कलंदर, ब्लॅकीस्ट हे त्यांचे कथासंग्रह तसेच ‘नवमीच्या मध्यरात्री’ हे ऐतिहासिक नाटक आणि ‘आषाढधारा’ हा ललित निबंधसंग्रह प्रसिद्ध झाला आहे. वाढते वय व त्यातच प्रकृतीच्या कारणामुळे हल्ली त्यांनी लेखन बंद केले होते. ‘वळून पाहता मागे’ हे आत्मकथा स्वरुपातील त्यांचे शेवटचे पुस्तक. त्यापूर्वी ‘प्रवाह’ हे त्यांचे अन्य एक पुस्तक प्रकाशित झाले होते.
गोमंतकीय मराठी साहित्य क्षेत्रात कथाकार म्हणून ते विशेष गाजले. तरुण भारत, गोमंतक, नवप्रभा, राष्ट्रमत आदी दैनिकांच्या रविवार आवृत्त्यामधून अनेक वर्षे त्यांनी सातत्याने कथा लिहिल्या. दिवाळी अंकाबरोबरच मैत्र, गोमंतकाची अस्मिता, किनारा, मिती या काही नियतकालींकामधूनही त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या. कथा हा प्रकार हाताळतानाच त्यांनी वैचारिक आणि ललीत लेखनही केले. महाभारतातील व्यक्तिरेखांवर आधारीत ‘द्युतचक्र’ या नावाने केलेले लेखन सर्जनशील समीक्षा म्हणून विशेष गाजली. विख्यात बंगाली लेखक शरदचंद्र चटर्जी यांच्या कादंबऱयातील स्त्री पात्रांवर आधारीत ‘शरदबाबूंच्या नायिका’ आणि ‘प्रवाह’ हे वैचारिक व चिंतनशील लेखसंग्रह वाचनीय ठरले. त्यांच्या ‘मृगजळ’ या कथासंग्रहाला प्रागतिक विचार मंचचा जी. ए. कुलकर्णी पुरस्कार तर ‘कलंदर’ आणि ‘शरदबाबूंच्या नायिका’ या पुस्तकांना गोमंतविद्या निकेतनचा पुरस्कार प्राप्त झाला.
साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना राजभाषा संचालनालयातर्फे देण्यात येणारा बा. द. सातोस्कर मराठी भाषा पुरस्कार, तसेच कोकण मराठी परिषदेचा महाकवी कालीदास पुरस्कार लाभला. गोमंतक मराठी अकादमीने 1994 साली मानद अधिसदस्यत्व देऊन त्यांच्या साहित्य सेवेचा सन्मान केला. 1995 साली तळवली-फोंडा येथे झालेल्या सहाव्या प्रागतिक मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते. तर सन 2009 मध्ये माशेल येथे झालेल्या 27 व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना लाभला.
पु. शि. नार्वेकर हे मूळ कुळे येथील असून त्यांचा जन्म बांदिवडे-फोंडा येथे 30 जून 1925 रोजी झाला. वास्को येथे मराठी प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर पोर्तुगीज व इंग्रजीतूनही त्यांचे शिक्षण झाले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी साकोर्डा येथील तळावलीकर खाण आस्थापनात त्यांनी नोकरी केली. कुळे सारख्या ग्रामीण भागात त्यांची कथा फुलली व संपूर्ण गोव्याच्या सीमा ओलांडून इतर राज्यातील मराठी भाषकांपर्यंत पोचली. गोवा मुक्तीलढय़ातील प्रणेते डॉ. राम मनोहर लोहिया, प्रसिद्ध साहित्यिक ग. त्र्यं. म्हाडखोलकर, ना. सी. फडके आदी महनीय व्यक्ती गोव्यात आल्यानंतर नार्वेकरांची भेट घेत. केसरी, लोकशक्ती, गावकरी आदी महाराष्ट्रातील काही दैनिकांमधून त्यानी राजकीय व्यंगचित्रेही रेखाटली आहेत.
नार्वेकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे आठ दिवसांपूर्वी गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना कोरोनाचे निदान झाले. रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. कुळे येथील स्मशानभूमित दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पुत्र चंद्रशेखर, विवाहित कन्या खांडोळा महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख सुनेत्रा सुशांत कळंगुटकर, स्मिता अशोक सराफ तसेच स्नुषा, नातवंडे असा परिवार आहे.