423 धावांच्या आव्हानासमोर मध्य प्रदेश सर्वबाद 98
इंदोर / वृत्तसंस्था
इशान किशनची 94 चेंडूतील 173 धावांची तडाखेबंद फलंदाजी व वरुण ऍरॉनच्या (6-37) भेदक गोलंदाजीमुळे झारखंडने विजय हजारे चषक स्पर्धेतील सलामीच्या लढतीत मध्य प्रदेश संघाचा तब्बल 324 धावांनी फडशा पाडला. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळालेल्या झारखंडने किशनच्या तडाखेबंद दीडशतकामुळे 9 बाद 422 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात मध्य प्रदेशचा डाव 18.4 षटकात 98 धावांमध्येच गुंडाळला गेला.
22 वर्षीय डावखुरा फलंदाज इशान किशनने मध्य प्रदेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना 19 चौकार व 11 षटकार फटकावले. सलामीवीर उत्कर्ष सिंगने (6) स्वस्तात तंबूचा रस्ता धरल्यानंतर किशनने कुमार कुशाग्रसमवेत (26) दुसऱया गडय़ासाठी 113 धावांची भागीदारी साकारली आणि मोठय़ा धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करवून दिली.
किशनने 42 चेंडूत 50 धावा, 74 चेंडूत 100 धावा व 86 चेंडूत 150 धावा पूर्ण करत आपल्या आक्रमक फटकेबाजीची प्रचिती आणून दिली. किशनच्या या धडाकेबाज फलंदाजीमुळे झारखंडने एखाद्या भारतीय प्रथमश्रेणी संघातर्फे सर्वोच्च धावांचा विक्रमही प्रस्थापित केला. किशनने पहिल्या टप्प्यापासूनच फटकेबाजीला सुरुवात केली. नंतर तो गौरव यादवच्या गोलंदाजीवर शुभम शर्माकरवी झेलबाद झाला.
विराट सिंग (49 चेंडूत 5 चौकार, 3 षटकारांसह 68), सुमीत कुमार (58 चेंडूत 52) यांनी देखील उत्तम फटकेबाजी साकारली. शेवटच्या काही षटकात अनुकूल रॉय देखील 39 चेंडूत 7 चौकार, 3 षटकारांसह 72 धावा जमवत मध्य प्रदेशच्या गोलंदाजांवर आणखी तुटून पडला. त्याच्या फटकेबाजीनंतर झारखंडने 400 धावांचा टप्पा सहज सर केला.
विजयासाठी 423 धावांचे कठीण आव्हान असताना मध्य प्रदेशच्या डावाला वरुण ऍरॉनने चांगलेच खिंडार पाडले आणि यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी भरच पडली. ऍरॉनच्या भेदक गोलंदाजीमुळे एकवेळ तर मध्य प्रदेशचा निम्मा संघ अवघ्या 21 धावांमध्येच गारद झाला होता. नंतर त्यांचा पूर्ण डाव 18.4 षटकात 98 धावांमध्ये खुर्दा झाला.
संक्षिप्त धावफलक
झारखंड ः 9-422 (इशान किशन 173, अनुकूल रॉय 72, विराट सिंग 68, गौरव यादव 4-73, शुभम शर्मा 1-44). मध्य प्रदेश ः सर्वबाद 98. (अभिषेक शर्मा 42, वेंकटेश अय्यर 23. वरुण ऍरॉन 6-37, बाळकृष्ण 2-8).
हजारे चषक स्पर्धेतील अन्य सामन्यांचे निकाल
1) छत्तीसगड 231 वि. गुजरात 48.1 षटकात 7-237
2) हैदराबाद 5-349 वि. त्रिपुरा 42 षटकात सर्वबाद 236
3) गोवा 263 वि. बडोदा 48.3 षटकात 5-264
4) पंजाब 4-288 वि. तामिळनाडू 49 षटकात 4-289
6) विदर्भ 6-331 वि. आंध्र 49.2 षटकात 7-332
7) कर्नाटक 8-246 वि. उत्तर प्रदेश (विजयी) 45.2 षटकात 4-215
8) ओडिशा 8-258 वि. केरळ (विजयी) 38.2 षटकात 4-233