प्रतिनिधी / वास्को
झुआरीनगरातील कंटेनमेंट झोनमधील नागरिकांनी बुधवारी शासकीय अधिकाऱयांसमोर आपल्या समस्यां मांडून कंटेनमेंट झोनमधून मुक्त करण्याची मागणी केली. नागरिकांनी अधिकाऱयांना धारेवर धरल्याने अखेर या वस्तीतील सहाशे कुटुंबाना रेशनधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. मात्र, या लोकांना कंटेनमेंट झोनच्या निर्बंधांचा उबग येऊ लागल्याचे दिसत आहे.
झुआरीनगरातील कंटेनमेंट झोनमधील नागरिकांनी यापूर्वीही रस्त्यावर येऊन अधिकाऱयांसमोर तक्रारी मांडल्या होत्या. अधिकाऱयांनी नंतर त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला होता. या वस्तीभोवती सध्या कडक पोलीस बंदोबस्त आहे. त्यामुळे आता या वस्तीतील लोकांना आडवाटेने बाहेरही पडता येत नाही. त्यांच्यासाठी फिरती शौचालयेही उपलब्ध करण्यात आलेली आहेत. मात्र, गेले काही दिवस थंड राहिलेले वातावरण काल बुधवारी पुन्हा तापले. सुमारे शंभर लोक नाकाबंदीच्या ठिकाणी एकत्र आले. आपल्या प्रभागात कोरोना बाधीत कोणीच नसून या प्रभागाला कंटेनमेंट झोनमधून मुक्त करण्यात यावे अशी मागणी करून या लोकांनी आपल्या जीवनावश्यक वस्तूंसंबंधी तक्रारीही मांडल्या. या लोकांना सामोरे जातांना उपस्थित अधिकाऱयांनी कंटेनमेंट झोनमधून मुक्त करण्याच्या मागणीची दखल घेतली नाही. मात्र, या वस्तीतील सुमारे सहाशे कुटुंबांना रेशनधान्य आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे कार्य पार पाडले. त्यामुळे झुआरीनगरच्या कंटेनमेंट झोनमध्ये बुधवारी तेवढेच समाधान पाहायला मिळाले.
झुआरीनगरमध्ये काल बुधवारी कोविड चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आले नाहीत. मात्र, संध्याकाळपर्यंत या भागातील कोरोना बाधीतांची संख्या 157 झाली होती. खारवीवाडय़ावरील कंटेनमेंट झोनमध्येही बुधवारी स्वॅब घेण्यात आले नाहीत. या झोनमध्ये सोमवार व मंगळवार अशा दोन दिवसांत पाचशे लोकांचे स्वॅब कोविड चाचणीसाठी घेण्यात आले होते. बुधवारी संध्याकाळपर्यंत खारवीवाडा भागात कोरोना बाधीतांची संख्या 86 झाली होती. नवेवाडेतील कोरोना बाधीतांची संख्या 107 झाली आहे. तर बायणात 124 कोरोना बाधीत आहेत. हेडलॅण्ड सडय़ावरील कोरोना बाधीतांची संख्या 98 झाली आहे.
लॉकडाऊनच्या वृत्तामुळे वास्को बाजारपेठेत गर्दी
दरम्यान, उद्या शुक्रवारपासून गोव्यात तीन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाल्याची माहिती पसरल्याने गुरूवारी दुपारपासून वास्कोतील बाजारपेठेत ग्राहकांची संख्या वाढल्याचे दिसून आले. हल्ली वास्को शहरात लोकांची गर्दी कमी असते. मात्र, लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तू मिळणार नसल्याच्या भितीने भर पावसात लोकांनी खरेदीसाठी गर्दी गेली होती. पावसामुळे वास्को शहरातील बाजारपेठेत काही दुकानांमध्ये पाणी शिरण्याच्याही घटना घडल्या.
वास्कोत डेंग्यू फैलाव रोखण्यासाठी स्वतंत्र पथक
दरम्यान, वास्कोत दरवर्षीप्रमाणे यंदाही डेग्यूची भिती पसरलेली आहे. कोरोनाचा उद्रेक झालेला असतानाच आता वास्कोतील आरोग्य विभागाला डेंग्यूचाही सामना करावा लागणार आहे. मागच्या वर्षी जून ते ऑक्टोबरपर्यंतच्या काळात सहा जणांचा डेग्यूमुळे मृत्यू झाला होता. गेल्या पाच वर्षांपासूनच वास्कोत डेंग्यू ताप भिती निर्माण करीत आहे. यंदा कोरोनाच्या काळातही वास्कोत मागच्या मे महिन्यात तसेच जून महिन्यातसुध्दा विशेषता शांतीनगर भागात डेंग्यूचे अनेक रूग्ण आढळून आले. सुदैवाने कुणीही दगावला नाही. मात्र, डेंग्यूचे दरवर्षी प्रमाणे यंदाही डेंग्यूचे रूग्ण वाढण्याची भिती असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून वास्कोतील आरोग्य विभागाने डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी स्वातंत्र पथक स्थापन केले आहे. बहुतेक डॉक्टर्स आणि आरोग्य खात्याचे कर्मचारी कोरोना संसर्गाच्या सेवेत व्यस्त असल्यानेच डेंग्यू तापाचा सामना करण्यासाठी स्वातंत्र पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे.