शाळांची गुणवत्ता वाढणार, भौतिक सुविधा चांगल्या होणार, 2 कोटी 74 लाखाचा निधी
प्रतिनिधी/ सातारा
झेडपीच्या शाळा जिह्यात सुमारे 2300 आहेत. सध्याच्या परिस्थितीत गावाकडून शहराकडे मोठा कल असल्याने ग्रामीण भागातील झेडपीच्या शाळा ओस पडू लागल्या आहेत. पटाअभावी शाळांचे भविष्य अंधाकारमय बनू पहात आहे. असे असताना शाळांना नवजिवन देण्यासाठी शासनाच्यावतीने नेहमी प्रयत्न राहिलेला आहे. सातारा जिह्यातील निवडक 21 शाळांना भौतिक सुविधा पुरवण्यासाठी सुमारे 2 कोटी 74 हजारांचा निधी मंजूर करुन तो शाळांकडे वर्ग करण्यात आला आहे.
सातारा जिह्यातील ग्रामीण भागातील मुलभूत शिक्षणाचा अधिकार हा मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेतून मिळतो. परंतु नोकरी, व्यवसायानिमित्ताने स्थानिकांना शहराचा ओढा असतो. त्यातच खाजगी शाळांचे अलिकडे पेव ग्रामीण भागातही फुटू लागले आहे. खाजगी शाळांच्या तुलनेत झेडपीच्या शाळा खुपच मागे असतात. तरीही गरीबांच्या मुलांना शिक्षण हे झेडपीच्या शाळेतच मिळते. खाजगी शाळेत शेक्षण हे पैसेवाल्यांची मुले घेतात. शासनाकडून झेडपीच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी नेहमी प्रयत्न राहिलेला आहे. मध्यंतरी आयएसओ शाळा करण्यात आल्या. त्यानंतर ज्या शाळांना लाईट नाही त्या शाळांना लाईट देण्यासाठी सौर उर्जा प्रकल्प करण्याचा ठराव झेडपीच्या सभेत करण्यात आला होता. आताही जिह्यातील 21 शाळांचा समावेश झाला आहे. या शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनाने 2 कोटी 74 लाख 56 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलण्यास सुरूवात झाली आहे. राज्यातील प्राथमिक शाळा आदर्श विकसीत करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या शाळांच्या सोयी सुविधासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आदर्श शाळा उपक्रमासाठी भरघोस निधी मिळाल्याने जिह्यातील 21 प्राथमिक शाळांचे रूपडे पालटणार आहे. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळांत भौतिक सुविधांचा विकास होण्यास मदत होणार आहे. आदर्श शाळांना मिळालेल्या निधीतून अध्ययन, शैक्षणिक गुणवत्ता, अध्यापनाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शालेय वातावरण , सुशोभिकरण करणे,विद्यार्थ्यांचा शारीरीक, बौध्दिक व मानसिक विकास करणे, वर्गखोली बांधकाम, विज्ञान व गणित प्रयोगशाळा, ग्रंथालय व संगणक कक्ष, स्वयंपाकगृह, पिण्याचे पाणी, मुला-मुलीसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, हँड वॉश, रॅम्प, क्रिडांगण विकास, सौर ऊर्जा, वर्गखोल्यांची दुरूस्ती यासह अन्य विविध कामे होणार आहेत.