गुजरातमध्ये भीषण रस्तेदुर्घटना – 4 जणांची प्रकृती गंभीर
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरातच्या अमरेली जिल्हय़ातील बरदा गावानजीक एक ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडपट्टीमध्ये शिरला आहे. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला तर 16 जण जखमी झाले आहेत. यातील 4 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या सर्व जखमींना सांवरकुंडला येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा ट्रक भावनगर जिल्हय़ातील महुवा येथे जात होता.
भरधाव ट्रक 5-6 झोपडय़ांमध्ये शिरला होता. दुर्घटनेवेळी या झोपडय़ांमध्ये 20-25 लोक झोपलेले होते. लोकांना चिरडल्यावर ट्रक खड्डय़ात कोसळला. जखमी लोकांची आरडाओरड ऐकून नजीकच्या गावातील लोक मदतीसाठी धावून आले. त्यांनीच रुग्णवाहिका तसेच पोलिसांना पाचारण करत बचावकार्य सुरू केले.
मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. अधिकाऱयांशी चर्चा करत जखमींच्या उपचारात कुठलीच दिरंगाई होऊ नये असे बजावल्याचे रुपाणी यांनी म्हटले आहे.