नैरोबी
टांझानियातील एका चर्चमधील प्रार्थनासभेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. काही जण जखमी झाल्याने मृतांची संख्या वाढू शकते असे मोशी शहराचे आयुक्त किप्पी वारिओबिया यांनी म्हटले आहे. राष्ट्रपती जॉन मागुफुली यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
‘अराइज अँड शाइन’चे लोकप्रिय धर्मप्रचारक बोनिफेस म्वामपोसा यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी झालेल्या प्रार्थनासभेत ही चेंगराचेंगरी झाली आहे. म्वामपोसाने प्रार्थनासभेत ‘पवित्र तेल’ जमिनीवर शिंपडल्यानंतर चेंगराचेंगरी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
हे तेल आजारांवर मात करणारे असल्याचे मानले जाते. जमावाने स्वतःच्या आजारावरील उपचाराच्या अपेक्षेने या तेलाला स्पर्श करण्यासाठी धाव घेतली होती. चेंगराचेंगरी दृश्य अत्यंत भयावह होते. लोक अत्यंत निर्दयीपणे परस्परांना चिरडून तेलाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते.
याप्रकरणी तपास सुरू असून पाद्रय़ाने आत्मसमर्पण करावे असे टांझानियाचे पोलीस प्रमुख सायमन सिरो यांनी म्हटले आहे. टांझानियात अलिकडच्या वर्षांमध्sय चमत्कारांचा दावा करणाऱया पाद्रय़ांची संख्या वाढली आहे.