‘ई-कॉमर्स’ क्षेत्रात मोठी मुसंडी मारण्याचे मुकेश अंबानी यांचे मनसुबे ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’ नि ‘रिलायन्स रिटेल’नं स्पष्ट केल्यानंतर ‘टाटा समूहा’नं देखील वेळ न गमावता आपल्या त्या दिशेनं विस्ताराच्या बेतांना पुढं रेटण्यास प्रारंभ केलाय…याअंतर्गत त्यांनी ‘बिगबास्केट’मध्ये हिस्सा खरेदी करण्याची तयारी चालविलीय. याशिवाय त्यांची नजर वळलीय ती ‘ऑनलाईन फार्मसी’कडे…
विश्वविख्यात ‘टाटा समूहा’नं सध्या लक्ष केंद्रीत केलंय ते 2011 साली स्थापन झालेल्या ‘बिगबास्केट’च्या सुमारे अर्ध्या हिश्श्यावर…जर समूह हिस्सा घशात घालण्यात यशस्वी ठरला, तर एखाद्या भारतीय कंपनीनं नवीन उद्योगात केलेली ती सर्वांत मोठी गुंतवणूक ठरेल…‘सॉल्ट्स-टू-सॉफ्टवेअर ग्रुप’ म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या ‘टाटा’ला त्या ‘ग्रोसरी ई-टेलर’मध्ये किमान 50 टक्क्यांचं अधिग्रहण करायचंय…आस्थापन ‘समूहा’चा विस्तार करण्यासाठी नवीन गुंतवणुकीचं साहाय्य घेणार असून सध्या ‘टाटा उद्योगसमूह’ अजस्र चिनी ‘ई-कॉमर्स’ कंपनी ‘अलिबाबा’ नि अन्य समभागधारकांचे ‘शेअर्स’ विकत घेण्यासाठी सज्ज झालाय…
भारत व चिनी कंपन्यांमधील हा व्यवहार जन्म घेणार तो पूर्व लडाखमधील लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर. शिवाय भारत सरकारनं ‘भूराजकीय’ परिस्थिती बिघडल्यामुळं चीनमधून येणाऱया गुंतवणुकीवर निर्बंध घालण्याचं ठरविलंय…‘अलिबाबा’नं ‘बिगबास्केट’चा 25 ते 30 टक्के हिस्सा घातलाय. ‘ड्रगन’च्या भूमीवरील त्या विश्वविख्यात आस्थापनानं ‘बिगबास्केट’च्या घरात प्रवेश केला तो 2018 साली…जर ‘टाटा समूहा’नं ‘बिगबास्केट’ला यशस्वीरीत्या धडक दिली, तर त्या ‘ग्रोसरी ई-टेलर’ कंपनीला ‘रिलायन्स’च्या ‘जिओमार्ट’ला फारशा दडपणाला तोंड न देता सामोरं जाणं शक्य होईल…
करारानं अजूनपर्यंत अंतिम टप्प्यात प्रवेश केलेला नसून ‘टाटा’चं येऊ घातलेल्या दिवसांतील ‘शेअरहोल्डिंग’ अवलंबून असेल ते आस्थापनाच्या ‘मूल्या’वर अन् सध्याच्या ‘शेअरहोल्डर्स’बरोबरच्या चर्चांवर…सर्वांत महत्त्वाचं स्थान ‘अलिबाबा’चं, कारण त्यांच्या मुठीत आहेत विविध हक्क व ‘राईट ऑफ फर्स्ट रिफ्युजल’. त्यात समावेश प्रतिस्पर्ध्याला अडविण्याचा. ‘रिलायन्स’ला सुद्धा ‘फ्युचर रिटेल’च्या बाबतीत ‘ऍमेझॉन’नं अशाच पद्धतीनं घाम काढलाय. तथापि ‘अलिबाबा’च्या यादीत ‘टाटा उद्योगसमूहा’चा प्रतिस्पर्धी म्हणून उल्लेख असणं मात्र अत्यावश्यक…जर ‘टाटा ’ला ‘बिगबास्केट’मध्ये अपेक्षेहून कमी हिस्सा खरेदी करण्याची संधी मिळाली, तर कंपनीच्या व्यवस्थापनात बदल होणार नाही, परंतु महान रतन टाटांच्या समूहाचं भक्कम आर्थिक समर्थन मात्र ‘बिगबास्केट’ला निश्चितच मिळेल…
यंदा ‘कोरोना’ महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकांनी ‘ऑनलाईन ग्रोसरी’ सेवांच्या दिशेनं मोठय़ा प्रमाणात धाव घेतल्यानं त्यांची चांदी झालेली असून त्यांचा एकंदरित ‘ग्रॉस मर्कंडाईज व्हेल्यू’ (जीव्हीएम) 3 अब्ज डॉलर्सवर पोहोचल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. गेल्या वर्षी हा आकडा होता 1.9 अब्ज डॉलर्सच्या घरात…‘बिगबास्केट’नं सप्टेंबरमध्ये ‘कोव्हिडपूर्व’ स्थितीशी तुलना केल्यास आपल्या नव्या ग्राहकांच्या संख्येत तब्बल 84 टक्के वाढ झाल्याचं स्पष्ट केलं होतं…
‘टाटा’नं पुढं पाऊल टाकलंय ते येऊ घातलेल्या ‘सुपर ऍप’चं स्थान मजबूत बनविण्यासाठी. त्यामुळं खात्रीनं वृद्धी होईल, जीवघेण्या स्पर्धेला प्रारंभ होईल तो मात्र भारतातील किराणामालाच्या ‘ऑनलाईन’ विश्वात. ‘रिलायन्स जिओमार्ट’, ‘ऍमेझॉन इंडिया’, ‘वॉलमार्ट’नं काबिज केलेलं ‘फ्लिपकार्ट’ आणि ‘ग्रोफर्स’सारखे ‘स्टार्टअप्स’ यांच्यात निःसंशय दर्शन घडेल ते अटीतटीच्या शर्यतीचं…समूहानं गेल्या वर्षी याच उद्देशानं स्थापना केली होती ती ‘टाटा डिजिटल’ची. ‘ग्रुप’ ‘ट्रेंट’च्या ‘स्टार बझार’शाr (सर्व ‘टाटां’चेच अवयव) वितरणासाठी करार करण्याचीही शक्यता आहे…
याशिवाय ‘इंडियामार्ट इंटरमेश प्रायव्हेट लिमिटेड’ या ‘बिझनेस-टू-बिझनेस मार्केटप्लेस’मध्ये मध्ये हिस्सा खरेदी करण्यासाठी ‘टाटा समूहा’नं पाऊल पुढं टाकल्याचा दावा करण्यात येतोय. मात्र ‘इंडियामार्ट’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश अगरवाल यांनी ती वार्ता तथ्यहीन असल्याचा म्हटलंय. 1999 मध्ये सुरू करण्यात आलेल्या सदर आस्थापनाच्या दाव्यानुसार त्यांच्या ताब्यात आहे तो ‘बिझनेस-टू-बिझनेस मार्केटप्लेस’च्या विश्वातील 60 टक्के हिस्सा…त्यांचे ‘शेअर्स’ यंदा 142 टक्क्यांनी वधारलेले असून बाजारमूल्य पोहोचलंय 2 अब्ज डॉलर्सवर…
अन्य एका घडामोडीनुसार, ‘टाटा ग्रुप’नं ‘ऑनलाईन फार्मसी’वर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दिशेनं देखील पाऊल टाकलंय…‘टाटा’ची चर्चा चाललीय ती गुरगावच्या ‘वन एमजी’शाr. मुंबईच्या ‘सॉल्ट्स-टू-सॉफ्टवेअर’ समूहाला त्या आस्थापनात मोठा हिस्सा खरेदी करायचाय…विशेष म्हणजे ‘वन एमजी’चा 10 कोटी डॉलर्स निधी ‘फंडिंग’च्या साहाय्यानं ‘गजा कॅपिटल’च्या नेतृत्वाखालील ‘प्रायव्हेट इक्विटी कन्सोर्शम’कडून उभारण्याचा प्रयत्न चाललाय. गुंतवणुकीसंबंधीच्या दोन्ही चर्चा एकाचवेळी चालू आहेत…‘टाटा उद्योगसमूहा’ला हव्या असलेल्या ‘वन एमजी’मधील हिश्श्याविषयी अजूनपर्यंत एखादं वृत्त प्रसिद्ध झालेलं नसलं, तरी एक गोष्ट मात्र निश्चित आणि ती म्हणजे दिग्गज समूहांनी ‘ऑनलाईन फार्मसी’च्या जगात मोठय़ा उत्सुकतेनं पाहायला प्रारंभ केलाय…‘रिलायन्स रिटेल’नं ‘नेटमेड्स’मध्ये 60 टक्के हिस्सा खरेदी केलाय, तर ‘ऍमेझॉन इंडिया’ व ‘फ्लिपकार्ट’ यांनीही त्या दिशेनं उड्डाण केलंय. प्रतिस्पर्धी ‘मेडलाईफ’चा आकार लहान असून सुद्धा त्या आस्थापनात विलीन होण्याचा निर्णय ‘फार्मईझी’नं घेतलाय…
मोठय़ा कंपन्यांशी झुंजण्यासाठी ‘मेडलाईफ’ आस्थापनानं नव्या निधीचा शोध घेण्यासाठी चर्चा सुरू केलीय…‘वन एमजीमध्ये अनेकांना रस असून ‘टाटा’नं भविष्यातील ‘ई-कॉमर्स’संबंधी विचार करून पुढं पाऊल टाकलंय. ‘गजा कॅपिटल’नं देखील नेटानं प्रयत्न चालूच ठेवलेत…सध्या ‘वन एमजी’चे सहसंस्थापक नि ‘सीईओ’ प्रशांत टंडन यांचा विचार चाललाय तो कुठल्या गुंतवणूकदाराला पकडणं योग्य ठरेल याविषयी. कारण रतन टाटांच्या समूहाला नकार देण्याचं धाडस भारतातील फारशा कंपन्यांमध्ये नाहीये. या क्षेत्रातील आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकविणारं अजूनपर्यंतचं सर्वांत मोठं आस्थापन म्हणजे ‘वन एमजी’…‘वन एमजी’चं मूल्य 2019 साली 20 कोटी ते 22.5 कोटी डॉलर्स होतं…‘ई-फार्मसी’ या संकल्पनेला आपल्याकडे अधिक लोकप्रिय बनविण्याचं श्रेय जातंय ते ‘कोव्हिड’ची साथ नि ‘लॉकडाऊन’कडे. भारतात 2025 पर्यंत ‘ऑनलाईन फार्मसी’ 7 कोटी घरांना धडक देतील नि त्यात असलेल्या ‘प्लेयर्स’ची संख्या जवळपास 75 वर पोहोचेल असा अंदाज एका अहवालानं व्यक्त केलाय!
– राजू प्रभू