आयपीएल कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीत निर्णय
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताच्या सर्वात मोठय़ा उद्योग समुहांपैकी एक असणारे टाटा समूह या वर्षापासून आयपीएलचे नवे प्रायोजक असतील, अशी घोषणा आयपीएल कार्यकारिणीने मंगळवारी केली. आयपीएल कार्यकारिणी अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना याला दुजोरा दिला. उभय घटकातील हा करार किती रकमेचा आहे, त्याचे तपशील मात्र अद्याप जाहीर केले गेलेले नाहीत.
यापूर्वी, चायनीज मोबाईल कंपनी व्हिवोने 2018 ते 2022 या कालावधीकरिता 2200 कोटी रुपयांना आयपीएल प्रायोजकत्व करार केला होता. मात्र, 2020 मध्ये गलवान खोऱयातील संघर्षामुळे उभय देशात तणाव निर्माण झाला आणि गतवर्षीच व्हिवोशी कराराला ब्रेक देण्यात आला. त्यानंतर ड्रीम 11 प्रायोजक होते. 2021 मध्ये पुन्हा व्हिवोचे प्रायोजक म्हणून पुनरागमन झाले. मात्र, चायनीज उत्पादनांविषयी जनमतात विरोध निर्माण झाल्याने व्हिवोला करार पूर्ण होण्यापूर्वीच सोडून देणे भाग पडले.
व्हिवोऐवजी नवे प्रायोजक आले असले तरी त्यांच्याकडून 440 कोटी रुपये हंगामाकरिता अदा केले जाणार असल्याने बीसीसीआयचा काहीही तोटा होणार नाही, असे संकेत आहेत. प्रायोजकत्वातून मिळणाऱया रकमेतील 50 टक्के वाटा बीसीसीआय आपल्याकडे ठेवून घेते आणि उर्वरित 50 टक्के रक्कम सर्व आयपीएल प्रँचायझीमध्ये वितरित करते. 2023 मध्ये नव्याने निविदा मागवल्या जाणार असल्याने टाटा समुहाशी करार तूर्तास केवळ एकाच हंगामापुरता असू शकेल, असे चित्र आहे.