वृत्तसंस्था / मुंबई :
आतापर्यंत आपण क्रेडीट, डेबिट कार्ड किंवा पीओएस मशीनवर कार्ड वापरून एखाद्याला पैसे देत होतो. पण आता आपल्या हातातील घडय़ाळच पैसे भरण्याचे काम करणार आहे. होय, हे खरं आहे. घडय़ाळाच्या व्यवसायात असणारी दिग्गज कंपनी टायटन आणि बँकिंग क्षेत्रातील आघाडीवरची बँक एसबीआय याकरीता एकत्र आले आहेत. पैसे देणारे हे एकमेव पहिलेवहिले घडय़ाळ असल्याचे टायटनने सांगितले आहे.
विनासंपर्क पैसे देणारे घडय़ाळ टायटनने विकसित केले असून याअंतर्गत सर्व डिजिटल व्यवहार एखाद्याला करता येणार आहेत. यासाठी टायटनने एसबीआयशी भागीदारी केली आहे. सध्याला कोरोनाव्हायरसच्या वाढत्या प्रमाणामुळे डिजिटल व्यवहारांना महत्त्व वाढले असून हीच बाब हेरत टायटनने नवे रक्कम देय करणारे घडय़ाळ विकसित केले आहे. घडय़ाळाच्या माध्यमातून संपर्क न करता रक्कम अदा करता येणार आहे. 2 हजारपर्यंतची रक्कम पीन नंबरशिवाय भरता येणार आहे. 2 हजार 995 रुपये ते 5 हजार 995 रुपये इतकी याची किंमत असणार आहे.