प्रतिनिधी/ बेळगाव
भाऊबंदकीच्या वादातून गवळी गल्ली, मंगळवारपेठ, टिळकवाडी येथील एका युवकावर तलवार हल्ला झाला आहे. सोमवारी दुपारी व्हॅक्सिनडेपोजवळ घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. यासंबंधी टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
श्रीकांत बबन गवळी (वय 35, रा. गवळी गल्ली) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याला खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या दोन्ही पायांवर तलवार (लांग)ने हल्ला करण्यात आला आहे. सुरुवातीला रक्तबंबाळ अवस्थेत तो व्हॅक्सिनडेपोजवळ पडला होता. त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.
सिव्हिल हॉस्पिटलमधून खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती समजताच टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने परिसरात काही काळ तणावाची स्थिती होती. नंतर खासगी इस्पितळाला भेट देवून पोलिसांनी जखमी श्रीकांतची जबानी घेतली.
श्रीकांतने महेश व शाम या आपल्या दोन भावांवर फिर्याद दिली असून खुनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरुन त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भा.दं.वि. 307 सहकलम 34 अन्वये गुन्हा दाखल करुन चौकशी हाती घेण्यात आली आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. श्रीकांतवर हल्ला करणाऱया त्याच्या दोघा भावांचा शोध घेण्यात येत आहे.