टेनिसस्टार ऐश्वर्या जाधवची यशोगाथा ः 7 वर्षात 25 राज्य आणि 31 राष्ट्रीय स्पर्धेत अजिंक्य
कोल्हापूर / संग्राम काटकर
कोल्हापूरची 13 वर्षीय बालिका ऐश्वर्या जाधव आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर देशाच्या टेनिस विश्वाचे लक्ष वेधून घेत आहे. तिने गेल्या 7 सातच वर्षात 10, 12 व 14 वर्षाखालील मुलींच्या गटातून 25 हून अधिक राज्यस्तरीय आणि 40 हून अधिक राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत प्रतिनिधीत्व करुन 31 स्पर्धेत विजेतेपद मिळवून आपला दबदबाही निर्माण केलाय. या कामगिरीमागे रोज 4 तास टेनिसचा सराव आणि 1 तास वर्कआऊट असे कष्ट आहेत. आणखी एक वैशिष्ठÎ म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून 13 वर्षीय ऐश्वर्या राष्ट्रीय 16 वर्षाखालील मुलींच्या टेनिस स्पर्धेत एकेरी व दुहेरी गटातून सहभागी होत आहे. इतकेच नव्हे तर तिने स्पर्धेत नामवंत मुलींना पराभूत करत आपली धमक दाखवून दिली आहे.
शालेय शिक्षण घेताना एखाद्या खेळाचाही सराव असावा म्हणून ऐश्वर्याला वडील दयानंद यांनी मेरीवेदर ग्राऊंडवरील कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनच्या टेनिस संकुलात दाखल केले. योवळी ती फक्त 6 वर्षाची होती. छत्रपती शाहू विद्यालयात शिक्षण घेत घेत ती टेनिसचा सराव करु लागली. यावेळी तिला पुढील 7 वर्षात आपण राष्ट्रीय खेळाडू म्हणून नावारुपाला येईन, याची कल्पनाच नव्हती. पण रोज कसून केलेल्या सरावामुळे टेनिसकोर्टवर दीड-दोन तास टिकून राहण्याची तिच्यात क्षमता निर्माण झाली. या क्षमतेच्या जोरावर तीने तिने 10 राज्यस्तरीय 10 वर्षाखालील मुलींच्या स्पर्धेत सहभागी होऊन त्यापैकी 9 जिंकल्या. या कामगिरीमुळे ऐश्वर्या महाराष्ट्राच्या क्रमवारीत दुसऱया स्थानावर आली. इथेच तिच्यामध्ये दडलेला राष्ट्रीय खेळाडूही जागा झाला. प्रशिक्षक अर्षद देसाई व मनाल देसाई यांनीही तिच्याकडून शास्त्रशुद्धपणे सराव करवून घेण्यास सुरुवात केली.
ऐश्वर्याची राष्ट्रीय घौडदौड...
ऐश्वर्याची राष्ट्रीय पातळीवरची कामगिरीही प्रशंसनीयच आहे. अंगातील ताकद आणि क्षमतेच्या जोरावर ऐश्वर्या ही राष्ट्रीय स्पर्धेत खेळू शकेल, इतकी तयारीची झाली. 12 वर्षाखालील मुलींच्या गटाअंतर्गत दोन वर्षात झालेल्या 25 राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन तिने 10 स्पर्धांमध्ये विजेतेपद व 10 वेळा उपविजेतेपद मिळवून देशाच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर झेप घेतली. याचबरोबर 14 वर्षाखालील मुलींच्या गटातील 15 राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधीत्व करुन 8 विजेतेपदांवर कब्जा करुन राष्ट्रीय क्रमवारीत 12 वे स्थान पटकावले.
गेल्या 12 दिवसांपूर्वी अहमदाबादेत झालेल्या ऑल इंडिया सुपरसेरिज टेनिस स्पर्धेतील ऐश्वर्याचा सहभाग हा तिचा टेनिस जगतातील प्रगतीचा आलेख दाखवणारा ठरला. वय 13 असूनही ती 16 वर्षाखालील मुलींच्या गटातून स्पर्धेत सहभागी झाली होती. शिवाय तिने अंतिम फेरीत गुजरातच्या सायली ठक्करला 6-4 व 6-2 अशा सेटफरकाने हरवून विजेतेपदाला गवसणी घातली. या विजेतेपदातून मिळालेल्या 50 गुणांमुळे ती देशातील मुलींच्या गटात टॉप-टेनमध्ये आली. येत्या जानेवारी 2022 मध्ये औरंगाबादेत होणारी राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्यास ती 20 गुणांसह देशातील टॉप-टूमध्ये येणार आहे. शिवाय भारतीय संघातून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्वही करता येणार आहे. त्यामुळे तिने आता दृष्टीने सरावात स्वतःला झोकून दिले आहे.
विम्बलडन खेळण्याचे लक्ष्य...
आई अंजली, वडील दयानंद, प्रशिक्षक अर्षद आणि मनाल देसाई यांनी माझ्यासमोर आंतरराष्ट्रीय स्पर्धांसह विम्बडन खेळण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी जागतिक किर्तीची टेनिसस्टार सेरेना विल्यम्स यांचे मैदानातील सामने पाहून त्या तसा सराव मी करत आहे. पुढील 5-6 वर्षात आंतरराष्ट्रीय स्पर्धा व विम्बडन खेळू शकेन इतका मला आधुनिक सराव करावा लागणार आहे. तो करण्याची मी तयारी ठेवली आहे. – ऐश्वर्या जाधव