पुलाची शिरोली / वार्ताहर
टोप ( ता. हातकणंगले ) येथील शेततळ्यात बुडून शिये ता. करवीर येथील तरुणाचा मृत्यू झाला. जमीर इमाम पठाण ( वय ४३, रा. शिये, ता. करवीर ) असे मृताचे नाव आहे. याबाबत घटनास्थळी व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी कि, जमीरचा भाऊ इक्बाल हा दगड खाणीत ब्लास्टींग साठी होल मारण्याचा व्यवसाय करतो. टोप येथील खाणीत त्याचे काम सुरू आहे. कामगारांना जेवनाचा डबा देण्यासाठी जमीर दुपारी खाणीवर गेला होता. तेथे गेल्यावर पिण्यासाठी पाणी आणायचे म्हणून तो जवळील शेततळ्यात गेला. बराच वेळ तो परत न आल्याने त्याचा शोध घेतला. शेततळ्याच्या काठावर त्याने चप्पल काढून ठेवले होते. त्यामुळे तो शेततळ्यात बुडला असणार याची जाणीव झाली. पाण्यात शोध घेतला असता त्याचा मृतदेह मिळाला.
पावसामुळे शेततळ्याच्या भोवती निसरडे झाले होते. त्यामुळे जमीरचा पाय घसरून तो शेततळ्यात पडला. त्याला पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. याची शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.