प्रतिनिधी/ गुहागर :
गुहागर तालुक्यातील आबलोली येथे तवसाळ मार्गावर झालेल्या विचित्र अपघातात दोघे जण जागीच ठार झाले. अवघड वळणावर ट्रकमधील पोकलेन थेट ट्रकच्या केबिनवर जोरदार आदळल्याने ट्रकचालकासह दोघे केबीनमध्ये चिरडून ठार झाले. गुरूवारी दुपारी 1.15 च्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत शिवसेनेचे माजी उपतालुका प्रमुख व शिवस्वराज्य शेतकरी संघटनेचे संस्थापक आनंद भोजने यांच्या 24 वर्षिय मुलाचा मृत्यू झाला आहे.
अभिषेक आनंद भोजने (24, मासू), महामुद्दीन महामूल (52, पनवेल) अशी मृतांची नावे आहेत. गुरूवारी दुपारी 1 च्या सुमारास आनंद भोजने यांचा इएक्स 70 हा पोकलेन एका ट्रकमध्ये भरून त्यांचा मुलगा अभिषेक आबलोलीतच दुसऱया कामाच्या ठिकाणी निघाला होता. तवसाळ-आबलोली मार्गावरील आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वरीलबाजुला असलेल्या तीव्र उताराच्या अवघड वळणावर ट्रक आला असता पोकलेन केबिनच्या बाजूने सरकला. या पोकलेनने थेट केबिन फोडून चालक व आतमध्ये बसलेल्या या दोघांना ट्रकच्या डॅशबोर्डमध्ये चिरडले. यामध्ये ट्रक वळणावरील मातीच्या ढिगाऱयावर आदळला.
या अपघाताची माहिती कळताच शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिन बाईत यांच्यासह आबलोलीतील अनेक तरूण घटनास्थळी पोहचले. यानंतर जेसीबीच्या साहाय्याने ट्रकमधील पोकलेन बाजूला करण्यात आला. त्यानंतर ट्रकच्या केबीनमध्ये चिरडलेल्या दोघांना बाहेर काढण्यात आले. याठिकाणी कोळवली व आबलोली येथील दोन रूग्णवाहिका व आबलोली वैद्यकीय अधिकाऱयांची टीमही हजर होती. तातडीने दोघांनाही सलाईन चढवून अधिक उपचारासाठी डेरवण वालावलकर रूग्णालयात नेण्यात आले. मात्र डेरवण येथे उपचार सुरू असताना दुपारी 2.43 वाजता दोघांचाही मृत्यू झाला.
अभिषेकने दिली होती एमपीएस्सी परीक्षा
आनंद भोजने यांना दोन मुली व अभिषेक हा मुलगा आहे. अभिषेकने कोल्हापूर येथे एमएस्सी पूर्ण करून एमपीएस्सीची पूर्व परीक्षा दिली होती. लॉकडाऊनमुळे तो गावी आला होता. आपल्या वडिलांच्या अर्थमुव्हीगच्या व्यवसायामध्ये तो सहकार्य करत होता. पोकलेन दुसऱया ठिकाणी नेण्यासाठी या ट्रकमधून तो जात असताना हा अपघात घडला.