वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फेसबुक आणि ट्विटरकडून बंदी घातली गेली आहे. याचमुळे ट्रम्प यांच्या चाहत्यांनी त्यांच्यासाठी नवा मार्ग शोधून काढला आहे. ट्रम्प यांच्या टीमने एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सादर केला आहे. ट्रम्प यांचे माजी वरिष्ठ सल्लागार जेसन मिलर यांनी भाषणस्वातंत्र्य आणि कुठल्याही मजकुराला चालना देण्यासाठी ट्विटरसारखे सोशल मीडिया व्यासपीठ गेटर सादर केले आहे. पण अद्याप ट्रम्प यांनी यावर स्वतःचे अकौंट तयार केलेले नाही.
गेटर गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल ऍप स्टोअरवर मोफत डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. या ऍपला एका ब्राउजरद्वारेही ऍक्सेस करता येऊ शकते. 17 वर्षांहून अधिक वयाचे वापरकर्तेच हा ऍप वापरू शकतील. हा ऍप बऱयाचअंशी ट्विटरसारखाच आहे. मायक्रोब्लॉगिंग साइटच्या अनेक पैलूंचा यात समावेश आहे.
ट्रम्प अद्याप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दाखल झाले नसले तरीही त्यांचे गेटर हँडल ‘रियलडोनाल्ड ट्रम्प’ राखून आहे. या सोशल मीडियावर येण्याचे आवाहन आम्ही ट्रम्प यांना करत असल्याचे उद्गार मिलर यांनी काढले आहेत.