अमेरिकेचे सैन्य हटविण्यासाठी संसदेत मतदान शक्य : बहुतांश खासदारांनी केली मागणी
वृत्तसंस्था/ बगदाद
अमेरिकेचे सैन्य हटविण्यासाठी इराकमधील संसदेत मतदान घेतले जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात इराणच्या कुद्स फोर्सचे प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी मारले गेल्यावर तेहरान समर्थक गटांकडून अमेरिकेचे सैन्य असलेल्या तळांवर हल्ल्याची शक्यता वाढली आहे.
इराकच्या सुरक्षा दलांना रविवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून अमेरिकेच्या तळापासून किमान एक किलोमीटर अंतरावर राहण्याची सूचना करत आहोत, असे कातिब हिजबुल्ला गटाने म्हटले आहे. इराकच्या संसदेचे अधिवेशन रविवारीच समाप्त होणे अपेक्षित होते. या अधिवेशनात अमेरिकेच्या सैनिकांना देशाबाहेर काढण्याच्या प्रस्तावावर मतदान घेण्याची तयारी सुरू आहे.
5200 सैनिक तैनात
इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेला रोखण्यासाठी स्थानिक सैनिकांना प्रशिक्षण देणे तसेच सहाय्य करण्यासाठी इराकच्या तळांवर अमेरिकेचे सुमारे 5200 सैनिक तैनात आहेत. या सैनिकांना व्यापक आंतरराष्ट्रीय आघाडीच्या अंतर्गत तैनात करण्यात आले होते. इराक सरकारने इस्लामिक स्टेटला हुसकावून लावण्यासाठी 2014 मध्ये अमेरिकेच्या सैन्याला पाचारण केले होते.
शियाबहुल गट
हाशेडच्या शियाबहुल गटांचे इराणसोबत घनिष्ठ संबंध आहेत. ही संघटना कित्येक महिन्यांपासून अमेरिकेच्या सैनिकांना विरोध करत आहे. इराकच्या 329 सदस्यीय संसदेच्या कामकाजाची यादी प्रकाशित झालेली नाही. पण विदेशी सैनिकांच्या मुद्दय़ावर मतदान करविण्याची मागणी बहुतांश खासदारांनी लावून धरली आहे.
चिंतेचे कारण नाही : धर्मेंद्र प्रधान
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावाचा प्रभाव अनेक देशांवर पडू शकतो, असे मानले जात आहे. कच्च्या तेलाप्रकरणी भारतावरही याचा प्रतिकूल प्रभाव पडण्याची शक्यता आहे. देशांतर्गत कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविणे आणि पर्यायी ऊर्जेचा मार्ग शोधण्याच्या दिशेने काम सुरू आहे. कुवेत, संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियात शांतता असल्याने चिंता करण्याची आवश्यकता नसल्याचे विधान पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे. आंतरराष्ट्रीय कारणांमुळे कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. याप्रकरणी दिलासा मिळावा याकरता देशांतर्गत उत्पादन वाढविणे, आखाती देश वगळता अन्य ठिकाणांहून कच्च्या तेलाची खरेदी करणे आणि ऊर्जेसाठी अन्य पर्यायांचा स्वीकार करण्यावर काम सुरू असल्याचे ते म्हणाले.
सुलेमानी यांच्या स्थानी घानी
अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सैन्य कमांडर कासिम सुलेमानी मारले गेल्यावर त्यांच्या जागी कट्टरतावादी इराणी जनरल इस्माइल खानी यांची कुद्स दलाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांनी घानी यांची या पदासाठी निवड केली आहे. घानी हे सर्वात प्रतिष्ठित क्रांतिकारक गार्ड कमांडर्सपैकी एक असल्याचे कौतुकोद्गार खामेनेई यांनी काढले आहेत. 125000 सैनिक बाळगणाऱया इराण इस्लामिक रिव्होल्युशन गार्ड कॉर्प्सची कुद्स दल (आयआरजीसी) ही एक शाखा आहे. हे निमलष्करी दल सर्वोच्च नेते खामेनेई यांनाच थेट उत्तरदायी आहे. 62 वर्षीय घानी 1980 च्या इराक-इराण युद्धात सहभागी झाले होते. तसेच ते कासिम सुलेमानी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी राहिले आहेत. घानी हे इस्रायलविरोधी भूमिकेसाठी ओळखले जातात. बराक ओबामा अध्यक्ष असताना अमेरिकेने इराणच्या या निमलष्करी दलाला दहशतवादी संघटना घोषित केले होते. घानी यांच्यामुळेच अमेरिकेच्या सैनिकांना अधिक नुकसान सहन करावे लागले होते.