वयोवृद्ध नेत्यांना वगळले, सुनक यांना स्थान नाहीच
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनच्या नवनियुक्त पंतप्रधान लिझ ट्रस यांनी आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा केली आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात चार भारतीय वंशाच्या चेहऱयांना स्थान देण्यात आले आहे. तसेच हुजूर पक्षातील अनेक बुजुर्गांना वगळण्यात आले आहे. अश्वेत मंत्र्यांना महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. भारतीय वंशाच्या सुएला ब्राव्हरमन या ब्रिटनच्या नव्या गृहमंत्री असतील. त्यांचा जन्म तामिळनाडूतील हिंदू कुटुंबात झाला आहे. आग्रा येथे जन्म असलेले अलोक शर्मा यांचे पर्यावरण खाते सुरक्षित राहिले आहे. तसेच बेन व्हॅलेस यांचे संरक्षणमंत्रिपदही राखण्यात आले आहे.
श्रीलंका आणि भारत अशी मिश्र ओळख असलेले रानिल जयवर्धना यांना पदोन्नती देण्यात आली असून त्यांच्याकडे अन्न आणि ग्रामीण विकास हे विभाग सोपविण्यात आले आहेत. जॉन्सन मंत्रिमंडळात ते पर्यावरण राज्यमंत्री होते. जॉन्सन यांच्याविरोधात बंड केलेले माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांना मात्र आधी व्यक्त केलेल्या अनुमानानुसार मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. त्याचप्रमाणे त्यांना समर्थन देणाऱया अनेक बुजुर्ग नेत्यांनाही मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्यात आले आहे.
बुधवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री उशिरापर्यंत ट्रस मंत्रिमंडळाचा विस्तार पूर्ण होईल. अनेक उपमंत्र्यांची नावे अद्याप घोषित व्हावयाची आहेत. मूळचे घाना येथील रहिवासी क्वासी कॉरटेंग यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली असून त्यांना महत्त्वाचे खाते देण्यात येणार आहे. ते ब्रिटनचे पहिलेच कृष्णवर्णीय चान्सेलर असतील. त्यांना विदेश व्यवहार खाते देण्यात आलेले आहे.
ट्रस यांच्या विश्वासू सहकारी थेरेसी कॉफी यांना उपपंतप्रधानपदाचे उत्तरदायित्व सोपविण्यात आले आहे. तसेच त्यांच्याकडे आरोग्य आणि समाज कल्याण विभाग देण्यात आला आहे. वेंडी मोर्टन या ब्रिटिश संसदेच्या नव्या संसदीय सचिव असतील. त्यांच्याकडे मुख्य प्रतोदचे उत्तरदायित्वही देण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्रिपद केमि बॅडनोच यांना तर मेरी टॅव्हेलिन यांना वाहतूक विभाग देण्यात आला आहे. टॉम टुजेनडथ यांच्याकडे संरक्षण विभाग सोपविण्यात आला आहे. माजी उपमंत्री जेकब रिस-मॉग आणि सायमन क्लार्क यांना राज्यमंत्री म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांच्याकडे व्यापार खाते आहे.