थंडीमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी बरंच काही करावं लागतं. या काळात आपले छान छान कपडे स्वेटर, शालींच्या आत दडून जातात. म्हणूनच मग ट्रेंडी स्वेटर्स, स्वेट शर्टस, जॅकेट्स कॅप्स ट्राय कराव्या लागतात. बॉलिवूड दिवाजही वैविध्यपूर्ण आणि स्टायलिश विंटरवेअर कॅरी करत असतात. तुम्हीही त्यांच्याकडून थंडीतल्या स्टायलिंग टिप्स घेऊ शकता.
* टर्टलनेक स्वेटर कोणीही कॅरी करू शकतं. अगदी कॉलेजपासून ऑफिसपर्यंत म्हणजे कॅज्युअलपासून फॉर्मलपर्यंत कोणत्याही ऑकेजनला हा स्वेटर घालता येईल. हा स्वेटर स्टायलिश दिसतो. मध्यंतरी दीपिका पदुकोणने मोनोक्रोम लूक कॅरी केला होता. तिने गुलाबी रंगाचा टर्टलनेक स्वेटर घातला होता. त्यासोबत त्याच रंगाची पँटही होती. तिने गुलाबी पादत्राणं घातली होती. तुम्हीही असा मोनोक्रोम लूक ट्राय करू शकता.
* या दिवसात कॅप्स कॅरी करता येतील. लोकरीच्या ट्रेंडी कॅप्स खूप सुंदर दिसतात. बाजारात विविध रंगांच्या स्टायलिश कॅप्स मिळतात. अलिकडेच क्रिती सेनॉनने व्हेलवेटची कॅप घातली होती. तुम्ही नक्षीकाम केलेल्या कॅप्स घालू शकता. स्वेटशर्ट किंवा जॅकेटवर या कॅप्स खूपच सुंदर दिसतील.
* थंडी म्हटली की जॅकेट्स आलीच. बाजारात वेगवेगळ्या मटेरियल्सची जॅकेट्स मिळतात. ही जॅकेट्स वेस्टर्नवेअरसोबत साडी, सलवार कमीजवरही चालून जातात. सारा अली खान मध्यंतरी अशाच लूकमध्ये दिसली होती. तिने गुलाबी रंगाचं जॅकेट आणि त्याच रंगाचा स्कार्फ घेतला होता. खूप थंडी असेल तर तुम्ही हातमोजेही घालू शकता.