प्रतिनिधी /बेळगाव
एसकेई सोसायटीच्या ठळकवाडी हायस्कूलमध्ये दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुण्या म्हणून हेमांगी प्रभू, मुख्याध्यापक आर. आर. कुडतुरकर, शिक्षक सुरेश भातकांडे व मदन भोसले उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत व ईशस्तवनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. विलास खटावकर यांनी प्रास्ताविक केले. सुरेश भातकांडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
मुख्याध्यापक आर. आर. कुडतुरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी बाबुराव बेडरे, वैष्णवी भातकांडे, अनिरुद्ध सुतार, आकांक्षा पाटील, अंजली सुतार, साई पेडणेकर, भाग्यश्री भडगावे, अभिजीत संभाजी यांची भाषणे झाली. हेमांगी प्रभू यांनी दहावी विद्यार्थ्यांना अनेक यशस्वी व्यक्तींनी सुरुवातीला जीवनात मिळालेल्या अपयशानंतर सुद्धा भविष्यात कसे यश मिळविले? यांची सुंदर व प्रेरणादायक उदाहरणे देऊन मंत्रमुग्ध केले.
आदर्श विद्यार्थिनी-आदर्श विद्यार्थी पुरस्कार अनुक्रमे वैष्णवी भातकांडे व बाबुराव बेडरे यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सूत्रसंचालन सी. वाय. पाटील यांनी केले. एस. एन. गावडे यांनी आभार मानले.