जगभरात 1 लाख 27 हजार 594 जणांचा मृत्यू : संयुक्त राष्ट्राकडून अमेरिकेच्या निर्णयावर निराशा व्यक्त
जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता 20 लाख 14 हजार 9 वर पोहोचली आहे. तर एकूण बळींचा आकडा 1 लाख 27 हजार 594 झाला आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे याच कालावधीत 4 लाख 91 हजार 824 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गादरम्यान अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखला असून हा निर्णय धोकादायक असल्याची प्रतिक्रिया मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी व्यक्त केली आहे. तर डब्ल्यूएचओचा निधी रोखण्याची ही योग्य वेळ नसल्याचे उद्गार संयुक्त राष्ट्रसंघ महासचिव ऍण्टोनियो गुतेरेस यांनी काढले आहेत. कोरोना फैलाव रोखण्यासाठी योग्य पावले उचलली नसल्याचा आरोप करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संघटनेचा निधी रोखला आहे.
डब्ल्यूएचओची समीक्षा होणार
डब्ल्यूएचओने मूलभूत स्तरावर काम केले असते तर जगभरातील कोरोना बळींचा आकडा कमी झाला असता. डब्ल्यूएचओचा निधी रोखण्याचा निर्देश प्रशासनाला देत आहे. कोरोनासंबंधी डब्ल्यूएचओच्या भूमिकेची समीक्षा केली जाणार आहे. अमेरिका डब्ल्यूएचओला दरवर्षी सुमारे 3 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत करत असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
99 वर्षीय सैनिकाची कोरोनावर मात
दुसऱया महायुद्धात भाग घेतलेल्या 99 घेतलेले सैनिक इर्मांडो पिवेटा यांनी कोरोनावर मात केली आहे. पिवेटा यांनी दुसऱया महायुद्धात ब्राझीलच्या वतीने भाग घेतला होता. पिवेटा यांना कोरोना संसर्गामुळे सैन्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हिरव्या रंगाची टोपी परिधान करून पिवेटा रुग्णालयातून बाहेर पडल्यावर त्यांना ट्रंपेट वादन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
अमेरिकेत दिवसात 2407 बळी
अमेरिकेत 24 तासांमध्ये 2,407 जणांना जीव गमवावा लागला आहे. तसेच देशातील एकूण बळींचा आकडा आता 26,064 झाला आहे. तर दिवसभरात अमेरिकेत कोरोनाचे 26 हजार 945 रुग्ण सापडले आहेत. देशातील बाधितांची संख्या आता 6 लाख 14 हजार 246 झाला आहे. अमेरिकेच्या शिप मर्सी हॉस्पिटलच्या 5 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
ब्रिटन : 300 वर्षांमधील मोठी मंदी?
कोरोना विषाणूमुळे टाळेबंदी उन्हाळय़ापर्यंत कायम राहिल्यास ब्रिटनला 300 वर्षांमधील सर्वात मोठय़ा मंदीला सामोरे जावे लागू शकते. देशातील बेरोजगारीचा आकडा 13 लाख ते 34 लाखापर्यंत वाढू शकतो. एप्रिल-जूनदरम्यान अर्थव्यवस्थेच्या आकारात 35 टक्क्यांची घट होण्याची शक्यता असल्याचे ऑफिस फॉर बजेट रिस्पॉन्सिबिलिटीने म्हटले आहे.
इटलीत दिवसभरात 602 बळी
इटलीत मागील दोन दिवसांमध्ये बळींच्या संख्येत किंचित वृद्धी झाली आहे. 24 तासांमध्ये 602 जणांना जीव गमवावा लागला आहे. सोमवारी 566 तर रविवारी 431 जणांचा मृत्यू झाला होता. देशात आतापर्यंत 21 हजार 67 जणांनी जीव गमावला आहे. तर इटलीतील 1 लाख 62 हजार 488 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
स्पेनमध्ये 18 हजार 255 बळी
स्पेनमध्ये मंगळवारी 499 जणांचा मृत्यू झाला असून 3 हजार 961 नवे रुग्ण सापडले आहेत. स्पेनमधील एकूण बळींचा आकडा आता 18 हजार 579 वर पोहोचला आहे. तर देशात 1 लाख 77 हजार 633 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. रुग्णसंख्येप्रकरणी स्पेनचा क्रमांक अमेरिकेनंतर लागतो. स्पेनमधील स्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे मानले जात आहे.
इराणमध्ये 98 जणांचा मृत्यू
इराणमध्ये मंगळवारी 98 कोरोनाबाधितांना जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयानुसार देशात आतापर्यंत 4 हजार 683 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाची 74 हजार 877 जणांना बाधा झाली आहे. तेथे 24 तासांत 1574 नवे रुग्ण सापडले आहेत. इराण कोरोना संकटाशी संबंधित वास्तव दडपून ठेवत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.
फ्रान्स : चीनच्या राजदूताला समन्स
फ्रान्सच्या विदेशमंत्र्यांनी चीनच्या दूतावासाला समन्स बजावला आहे. चिनी दूतावासाच्या संकेतस्थळावर युरोपवर टीका करणारा दुसरा लेख प्रसारित करण्यात आल्याचा आरोप फ्रान्सने केला आहे. पाश्चिमात्य देशांनी वृद्धांना नर्सिंग होममध्ये मरण्यासाठी सोडल्याचे या लेखात नमूद करण्यात आले होते. फ्रान्सने चीनकडून लाखो मास्क मागविण्याच्या निर्णय घेतल्याने चीनने हा लेख प्रकाशित केला होता.
रियो डी जेनेरियोच्या गव्हर्नरांना कोरोना विषाणूची लागण
ब्राझीलच्या रियो डी जेनेरियो प्रांताचे गर्व्हर विल्सन विजेल यांना कोरोनाची लागण झाली आहे. विजेल आता स्वयं विलगीकरणाचे पालन करत काम करणार आहेत. अशक्तपणा वाटू लागल्यावर कोरोनाची चाचणी करवून घेतली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे विजेल म्हणाले. ताप, कोरडा खोकला आणि थकवा यासारखी अनेक लक्षणे दिसून येत आहेत. परंतु आता प्रकृती सुधारल्याचे वाटू लागले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करत विलगीकरणात काम करत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.