जिल्हा रुग्णालयातील सहापैकी दोनच डायलेसीस मशीन रडत-खडत सुरू : डायलेसीसअभावी मृत्यूसंख्या वाढीची नवी भीती
- डायलेसीस विभागाला करावी लागते तारेवरची कसरत
- शासन-प्रशासनाचा दुर्लक्ष बेतू शकतो रुग्णांच्या जीवावर
- तातडीने नवीन मशीन उपलब्ध करून देण्याची रुग्णांची मागणी
- पालकमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालण्याचीही जनतेतून मागणी
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
कोविडच्या अस्मानी संकटात जिल्हा आरोग्य यंत्रणेसमोर ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिविर व को-व्हॅक्सिनचा अपुरा पुरवठा ही आव्हाने समोर असतानाच आता डायलेसीस घेणाऱया कोविड रुग्णांची नवी समस्या मोठे आव्हान बनून पुढे आली आहे. संपूर्ण जिल्हय़ात फक्त जिल्हा रुग्णालयातच कोविड रुग्णांना डायलेसीस देण्याची सोय आहे. ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणून की काय, या रुग्णालयात उपलब्ध सहा मशीनपैकी चार बंद असून कार्यरत दोन कोणत्याही क्षणी बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱया काळात डायलेसीस न मिळाल्याने कोविड रुग्णांचे मृत्यू होण्याच्या घटना घडण्याची नवी भीती आहे.
जिल्हा रुग्णालयात डायलेसीस विभागामध्ये कार्यरत सहा मशीन्स पुरत्या जुन्या झाल्या आहेत. त्या स्टॅबिलायझरवर चालतात. त्यातील चार मागील काही महिन्यांपासून बंद आहेत. तर दोन अगदी रडतखडत सुरू आहेत. जिल्हय़ात सावंतवाडी, कणकवली व देवगड शासकीय रुग्णालयात डायलेसीसची सुविधा असली, तरी जिल्हा रुग्णालयात डायलेसीस घेण्यासाठी येणाऱयांची संख्या खूपच मोठी असते. दिवसाकाठी दोन शिफ्टमध्ये 12 रुग्णांना डायलेसीस केले जाते. मात्र आता केवळ दोनच मशीन सुरू असल्यामुळे सर्व रुग्णांना डायलेसीस मिळणे कठीण होऊ लागले आहे. त्यात आता डायलेसीस घेणाऱया कोविड रुग्णांची भर पडल्याने समस्येत अधिकच भर पडली आहे. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयात दाखल पाच कोविड रुग्णांना डायलेसीस घ्यावे लागते. परंतु, त्यांना ते नियमित मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. नजीकच्या काळात अशा प्रकारे डायलेसीस घेणाऱया कोविड रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढू शकते आणि अशा परिस्थितीत अगदी कशाबशा कार्यरत असलेल्या मशीन्स बंद पडल्या, तर मात्र मोठी आपत्ती डायलेसीस घेणाऱया कोविड रुग्णांवर कोसळू शकते.
जुन्या मशीनमध्ये जसजसे व्होल्टेज कमी-जास्त होते, त्याचा परिणाम त्यांच्या सेन्सरवर होतो व त्यामुळे त्या वारंवार बंद पडतात. अशामुळे रुग्णाला अपुरा डायलेसीस मिळतो. तसेच वेटिंगवर असलेल्या रुग्णांना डायलेसीस मिळत नाही. अलिकडे नवीन मशीनमध्ये सी. पी. एस. म्हणजेच ‘कंटय़ुनिअस पॉवर सप्लाय’ हे उपकरण इनबिल्टच असल्यामुळे वीजपुरवठा कमी-जास्त झाला, तरी त्याचा मशीनच्या कार्यक्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे आता जिल्हा रुग्णालय प्रशासनाने आपल्या डायलेसीस सेंटरची सध्याची दुर्दशा लक्षात घेऊन कोविड पॉझिटिव्ह डायलेसीस रुग्णांसाठी त्याचप्रमाणे डायलेसीस घेणाऱया अन्य रुग्णांसाठी तातडीने पुरेशा मशीन्स तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात. पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व जिल्हय़ातील लोकप्रतिनिधींनी यात गांभिर्याने लक्ष घालावे. जेवढे शक्य होईल तेवढय़ा लवकर या मशीन्स उपलब्ध करून द्याव्यात. डायलेसीस उपलब्ध नसल्यामुळे कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याची एकही घटना सिंधुदुर्गात घडू नये, हीच अपेक्षा.