नफा वाढला 113 टक्के- 448 कोटी प्राप्त
वृत्तसंस्था/ बेंगळूर
अव्हेन्यू सुपरमर्टस लिमीटेड यांच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱया डीमार्टला चालू आर्थिक वर्षात दुसऱया तिमाहीमध्ये दुप्पट निव्वळ नफा झाला असल्याची बाब समोर आली आहे. कंपनीने आपल्या दुसऱया तिमाहीचा निकाल नुकताच जाहीर केला आहे, त्यात नफा 113 टक्के इतका वाढल्याचे दिसले आहे. त्यामध्ये 448 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कंपनीला प्राप्त करता आला आहे.
शेअर बाजारात दिलेल्या माहितीनुसार यापूर्वीच्या आर्थिक वर्षामध्ये समान तिमाहीमध्ये कंपनीने 210 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला होता.
दमानी पाचव्या क्रमांकाचे धनवंत
डी-मार्ट ही राधाकिशन दमानी यांची कंपनी आहे. दमानी हे देशातील पाचव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत अब्जाधीश असल्याचे सांगितले जाते. कंपनीच्या महसूलामध्ये 46 टक्के इतकी वाढ झाली असून जुलै ते सप्टेंबरच्या कालावधीमध्ये 7 हजार 649 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त केला आहे.
12 हजार कोटीचा महसूल
दरम्यान आर्थिक वर्ष 2022 च्या पहिल्या सहा महिन्यात 12 हजार 681 कोटी रुपयांचा एकत्रित महसूल कंपनीने प्राप्त केला आहे. जो मागच्या आर्थिक वर्षात समान अवधीत 9 हजार 51 कोटी रुपये इतका होता.