स्वतःचा उदो-उदो चालवल्यामुळे स्वकियांमध्ये नाराजीचे वातावरण : काहींची छुपी चर्चा तर काही नेत्यांची परखड वक्तव्ये
प्रतिनिधी /बेंगळूर
कर्नाटकात 2023 मध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून राजकीय नेते आतापासून तयारी करत आहेत. निवडणुकीला अद्याप दोन वर्षांचा कालावधी आहे, पण राजकीय वर्तुळात निवडणुकीचाच विचार करूनच पावले टाकली जात आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी अलिकडेच एक ‘एडवटोरियल’ प्रसिद्ध करवून घेतल्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.
‘एडवटोरियल’मध्ये शिवकुमार यांचा उदोउदो करण्यात आला आहे. 2 जुलै रोजी ‘ए लाइफ इन लीडरशिप’ या शीर्षकासह प्रसिद्ध या जाहिरातीत शिवकुमार यांना ‘परिवर्तनाचा अग्रदूत’ संबोधण्यात आले आहे. शिवकुमार यांची प्रशंसा करणारे अनेक लेख आणि फीचर लिहिण्यात आले असून यात कोरोना महामारीदरम्यान त्यांनी लोकांचा जीव वाचविण्यासाठी अथक परिश्रम केल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न यातून झाला आहे. पण काँग्रेसच्या नेत्यांकडूनच शिवकुमार यांच्या स्व-प्रचारावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
राजकीय पीआर कंपनीकडून काम
डी. के. शिवकुमार यांची सार्वजनिक प्रतिमा तयार करणाऱया राजकीय पीआर कंपनीकडून हे काम करण्यात आले आहे. राजकीय नेते आणि राजकीय पक्षांसाठी त्यांच्याकडून करण्यात आलेल्या कामांबद्दल लोकांना सांगणे सामान्य बाब असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्त्या लावण्या बल्लाळ यांनी दिली आहे. पण काँग्रेसचे अनेक नेते सात लेखांमधील शिवकुमारांच्या स्वप्रचारावरून भडकले आहेत.
मुख्यमंत्रिपदाचे लक्ष्य
सेवा एका राजकीय नेत्याचा धर्म असून डी. के. शिवकुमार केवळ या धर्माचे पालन करत आहेत. जुलै 2020 मध्ये शिवकुमारांनी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यावर पक्षाच्या कॅडरमध्ये मोठा उत्साह संचारला असल्याचा दावा लावण्या यांनी केला आहे. 2023 च्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱयावरून सुरू असलेली अंतर्गत चढाओढ पाहता शिवकुमार यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
अनेक नेत्यांकडून टीका
काँग्रेस पक्षाच्या कार्यासाठी डी. के. शिवकुमार यांची प्रशंसा केली जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी कोरोना महामारीदरम्यान अनेक कामे केली आहेत, पण वैयक्तिक विजयाच्या स्वरुपात याबद्दल शेखी मिरवणे त्यांची असुरक्षितता दर्शविते. अनेक नेते त्यांच्या या कृतीमुळे असंतुष्ट असल्याचे काँग्रेसच्या एका नेत्याने म्हटले आहे.