प्रतिनिधी/ मडगाव
डी जे संगीतात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केलेले गोव्याचे युवा प्रतिभावान कलाकार दत्तराज उर्फ बंटी नाईक (35) यांचे काल मंगळवारी मुंबईत अल्प आजाराने निधन झाले. आज बुधवारी सकाळी 10 वा. मठग्रामस्थ हिंदु सभेच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या निधनावर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दुःख व्यक्त केले आहे.
दत्तराज नाईक यांच्या मागे पत्नी : स्टेफी, आई : सुचिता, विवाहित बहिण : सारिका असा परिवार आहे. मॉडेल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक दामोदर कवळेकर व स्वातंत्र्य सैनिक स्व. कुमूदिनी कवळेकर यांचे ते नातू होत.
दत्तराज उर्फ बंटी यांने मुंबईत जाऊन डी जे संगीतात आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केली होती. आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबत त्यांनी अनेक कार्यक्रम सादर केले होते. गेले काही दिवस ते आजारी होते व त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच काल मंगळवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
युवा व प्रतिभावान डी जे कलाकाराचे आकस्मिक निधन झाल्याने वैष्णवी क्रिएशनच्या कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. वैष्णवी क्रिएशनच्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग नेहमीच मोलाची भर घालणारा होता असे वैष्णवी क्रिएशनने म्हटले आहे.