एसपीएम रोड येथे पाणी वाया : कामकाजाबाबत नाराजी
प्रतिनिधी /बेळगाव
एसपीएम रोड येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरणानंतर आता पुन्हा डेनेज वाहिन्या घालण्यासाठी खोदाई सत्र सुरू आहे. त्यामुळे जलवाहिनींचे नुकसान होत असून, ठिकठिकाणी खोदण्यात आलेल्या चरीचा अडथळा वाहनधारकांना निर्माण झाला आहे. मनपाच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
एसपीएम रोडचे काँक्रिटीकरण पूर्ण करून दोन वर्षे झाली. मात्र, बाजूपट्टय़ांवर पेव्हर्स घालण्याचे काम अर्धवट झाले होते. हे काम पूर्ण करण्याऐवजी आता डेनेज वाहिन्या घालण्यासाठी पुन्हा खोदाई करण्यात येत आहे. या खोदाईसत्रामुळे रस्त्याच्या शेजारी चरी निर्माण झाल्या आहेत. या चरींमध्ये वाहने अडकण्याचे प्रकार सुरू आहेत. एका ठिकाणी मनपाचे कचरावाहू वाहन अडकल्याने बाहेर काढण्यासाठी कसरत करावी लागली. अशाप्रकारे दुचाकी आणि तीनचाकी वाहने अडकून बसल्याने नाहक त्रास सहन करावे लागत आहेत.
काही ठिकाणी जलवाहिन्यांचे नुकसान झाल्याने पाणी वाया जात आहे. सध्या पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने नागरिकांना पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. अशा स्थितीत आता जलवाहिनीचे नुकसान होऊन पाणी वाया जात असल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांसमोर नव्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. जलवाहिन्यांची दुरुस्ती करून डेनेजवाहिन्या घालण्याचे काम तातडीने पूर्ण करावे व खोदण्यात आलेल्या चरी व्यवस्थित बुजवाव्यात, अशी मागणी होत आहे.