फुलासह तराजू हा कोडवर्ड : पंजाबमध्ये अकाली दल अन् भाजपला समर्थन
डेरा सच्चा सौदा सिरसाच्या राजकीय शाखेने पंजाब विधानसभा निवडणुकीच्या काळात एका रात्रीत स्वतःचा निर्णय बदलला आहे. राजकीय शाखेकडून फुलासह तराजू हा कोडवर्ड प्रसारित करण्यात आला आहे. राजकीय शाखेच्या इशाऱयानुसार डेराप्रेमी शिरोमणी अकाली दलाला समर्थन करत होते. परंतु शनिवार संध्याकाळपर्यंत डेऱयाचे समर्थन केवळ भाजपला होते. परंतु अचानक निर्णय बदलण्याचे कारण राजकीय आहे. मालवामध्ये आम आदमी पक्षाला कमकुवत करण्यासाठी अकाली दलाला समर्थन देण्यात आले.
पंजाबमध्ये मालवातील मतदारसंघ लंबी, सरदूलगढ, जीरा, भटिंडा, गिदडबाहा, सुनाम या महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये डेरा प्रेमींनी अकाली दलाच्या उमेदवारांचे समर्थन केल्याचे चित्र दिसून आले. फिरोजपूर ग्रामीणमध्ये अकाली तर शहरात भाजप, पतियाळा शहर आणि ग्रामीण मतदारसंघात भाजपला समर्थन मिळाले आहे. धूरीमध्ये डेराकडून कुणालाच समर्थन देण्यात आलेले नाही. परंतु डेरेने आम आदमी पक्षापासून अंतर राखले आहे. तरीही डेरेने उघडपणे कुणाचेच समर्थन केलेले नाही. पंजाबमध्ये काँग्रेस, भाजप-पंजाब लोक काँगेस, शिरोमणी अकाली दल-बसप आघाडी यांच्यात प्रामुख्याने लढत होतेय.
डेरेच्या राजकीय शाखेने तलवंडी साबों मतदारसंघात डेरा प्रमुखांचे सासरे हरमिंदर जस्सी यांना समर्थन दिले आहे. जस्सी हे डेराप्रेमी असून सलग तीनवेळा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. याचमुळे डेरेची राजकीय शाखा त्यांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी पूर्ण जोर लावत आहे. जस्सी यापूर्वी काँग्रेसमध्ये होते, परंतु उमेदवारी न मिळालने तलवंडी साबों मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.
नोटाचाही उघड प्रचार
सर्व राजकीय पक्षांवर नाराज डेरेचा एक गट पंजाबमध्ये नोटाचा पर्याय निवडत असल्याचे मानले जाते. या मोहिमेच्या अंतर्गत डेराप्रेमी पंजाबच्या अनेक जिल्हय़ांमध्ये उघडपणे ‘नोटा’ला मत देण्याचे आवाहन करत होते. डेराप्रेमींचा एक गट सोशल मीडियारव फेथ व्हर्सेज व्हर्डिक्ट पेजवर नोटा मोहिमेच्या अंतर्गत सक्रीय होता.
मतदारसंघांवर प्रभाव
मालवा क्षेत्रात फिरोजपूर, मोगा, फाजिल्का, अबोहर, फरीदकोट, मुक्तसर साहिब भटिंडा, पतियाळा, लुधियाना, मानसा, संगरूर, बरनाला, मलेरकोटला, फतेहगढ साहिब या जिल्हय़ांचा समावेश होतो. मालवा क्षेत्रातील 69 विधानसभा मतदारसंघांमध्ये डेराचा प्रभाव असल्याचे मानले जाते.
डेरा अन् राजकारण
पंजाबमध्ये 2007, 2012 आणि 2017 च्या विधानसभा निवडणुकीत डेराची भूमिका राहिली होती. याचबरोबर 2014 ची लोकसभा आणि ऑक्टोबर 2014 मधील हरियाणा विधानसभा निवडणुकीत डेराने उघडपणे भाजपला पाठिंबा दिला होता. स्वतः डेरा प्रमुखांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना समर्थन दिले होते. तत्पूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी 2012 च्या निवडणुकीपूर्वी डेरा सच्चा सौदाला भेट दिली होती. बादल पिता-पुत्रानेही मतांसाठी डेरामध्ये हजेरी लावली होती.