अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार 13 ऑगस्ट 2021, सकाळी 10.45
● साथरोग नियंंत्रणात प्रशासन हतबल ● जिल्हा डेंग्यू, चिकणगुणियाने हैराण ● सातारा, फलटण, खटाव, माणला कोरोना रूग्णवाढीचा पुन्हा कहर ● शेजारच्या पुणे जिल्ह्यात डेल्टाचे तीन रूग्ण वाढले ● गेल्या 24 तासात नव्या 1090 रूग्णांची भर ●14505 संशयितांच्या चाचण्या● रूग्णवाढीची पुन्हा हजारी पार
सातारा / प्रतिनिधी :
काल गुरूवारी आलेल्या कोरोना रूग्णवाढीच्या अहवालाने जिल्हा पुन्हा हादरला असून सातारा, फलटण,खटाव, माण या तालुक्यात कोरोना रूग्णवाढीने चिंताजनक उसळी घेतली आहे. एका बाजूला कोरोना प्रार्दुभावाची ही स्थिती असताना दुसरीकडे जिल्ह्यात डेंग्यू आणि चिकणगुणियाच्या आजाराने डोके वर काढले आहे. या आजारांची रूग्णसंख्या आठवडाभरात अनपेक्षितपणे वाढल्याने नगरपालिका, ग्रामपंचायतींसह आरोग्य केंद्रांवरील ताण आणखी वाढला आहे. जिल्ह्यातील या स्थितीला सावरण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असतानाच शेजारच्या पुणे जिल्ह्यात डेल्टाचे आणखी तीन रूग्ण वाढले आहेत. याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. दरम्यान शुक्रवारी सकाळी आलेल्या अहवालात जिल्ह्यात कोरोनाचे 1090 नवे रूग्ण वाढले असून रूग्णवाढीची हजारी पार चिंतेत भर टाकणारी आहे. चोवीस तासात 14 हजार 505 संशयितांच्या चाचण्या झाल्या आहेत.
फलटण, खटाव, माण तालुक्यात पुन्हा शंभरी पार
जिल्ह्यात दुसरी लाट सुरू झाल्यापासून कराड आणि सातारा तालुक्यात रूग्णवाढीचा कहर कायम आहे. जिल्ह्यातील इतर सर्व तालुके जुलै महिन्यात सावरले असताना कराड, सातारा तालुक्यातील वाढ मात्र दोन,चार दिवसांचा अपवाद वगळता दीडशेच्या खाली आलीच नाही. गुरूवारी आलेल्या तालुकानिहाय अहवालात कराडला बाधित वाढ शंभरच्या खाली आल्याचे दिसते. मात्र फलटण 186, खटाव 179, माण 122 अशी रूग्णवाढ उसळी घेताना दिसत आहे. सातारा तालुक्यात जैसे थे रूग्णवाढ असून काल 171 नव्या रूग्णांची भर पडली आहे.
अचानक वाढलेली रूग्णवाढ कालचीच आहे का?
फलटण, खटाव, माण तालुक्यात रूग्णवाढीने धक्कादायक उसळी घेतली आहे. हे आकडे या तालुक्यांची चिंता वाढवणारे आहेत. मात्र नव्याने वाढलेले बाधित हे गेल्या 24, 36 तासातीलच आहेत की प्रलंबित अहवाल भरल्याने ही रूग्णवाढ दिसत आहे याबाबत उलटसुलट चर्चा आहे.
डेंग्यू, चिकणगुणियाने डोके वर काढले
कराड तालुक्यात कोरोना रूग्णवाढ कायम असतानाच कोयनावसाहत, आटके, वाठार,कोळेवाडी, कासारशिरंबे, उंब्रज, जिंती या गावांंत डेंग्यूचे रूग्ण जास्त आढळल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. सातारा तालुक्यातील शाहूपुरी, क्षेत्रमाहुली, विलासपूर भागासह शहरातील काही पेठांमधे डेंग्यूचे रूग्ण वाढत आहेत. फलटण तालुक्यातही डेंग्यू, चिकणगुणियाचे रूग्ण वाढले असून जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत जिल्ह्यात सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यात आणखी डेल्टाचे तीन रूग्ण
राज्यात गेल्या आठवड्यात डेल्टा प्लसचे 45 रूग्ण आढळले होतेे. अवघ्या चार दिवसा या रूग्णंमधे 20 ने वाढ झाली असून 65 राज्यात झाली आहे. नव्याने आढळलेले 20 रुग्ण हे मुंबई 7, पुणे 3, नांदेड, गोंदिया, रायगड, पालघर प्रत्येकी 2 आणि चंद्रपूर,अकोला येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. 65 डेल्टा प्लस रुग्णांपैकी 32 पुरुष असून 33 स्त्रिया आहेत. सातारा जिल्ह्यात दुसरी लाट अजुनही ओसरत नसताना पुण्यात डेल्टा प्लसचे रूग्ण आढळल्याने जिल्हावासियांनी अधिकची काळजी घेणे गरजेचे आहे. सातारा-पुणे दररोज माणसांची आवक-जावक हजारोंच्या संख्येत आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट आहेच पण नागरिकांनीही जबाबदारीचे भान बाळगण्याची गरज आहे.
गुरूवारी जिल्हय़ात एकूण बाधित 1090, एकूण मुक्त 695 एकूण मृत्यू 14
गुरूवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमूने 15,26,454 एकूण बाधित 2,29,749 घरी सोडलेले 2,14,987 मृत्यू – 5,518 उपचारार्थ रुग्ण-11453