चेन्नई / वृत्तसंस्था
सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरचे शुक्रवारी चेन्नईत आगमन झाले असून नंतर तो संघात दाखल झाला. शनिवारी त्याने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर याचा एक व्हीडिओ शेअर केला. ‘मी येथे पोहोचल्यानंतर मोठी झोप काढली. पण, आता क्वारन्टाईनचा कालावधी पूर्ण करेतोवर पास टाईम कसा करायचा, याचा विचार करतो आहे’, असे त्याने आपल्या हॉटेल रुममधून इन्स्टावर नमूद केले.
डावखुरा डेव्हिड वॉर्नर आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक असून त्याने आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात 5254 धावांची आतषबाजी केली आहे. याशिवाय, 2016 मध्ये संघाला जेतेपद मिळवून देण्यातही तो यशस्वी ठरला. मागील काही हंगामात सनरायजर्सतर्फे त्याने अव्वल दर्जाचे योगदान दिले आहे. मागील 6 हंगामात तर त्याने 500 व त्याहून अधिक धावा फटकावल्या आहेत.
युएईमध्ये संपन्न झालेल्या मागील आयपीएल स्पर्धेत त्याने मंद सुरुवात केली. पण, नंतर त्याला उत्तम सूर सापडला आणि त्याने हंगामात 548 धावा नोंदवल्या. यामुळे, सनरायजर्सचा संघ प्ले-ऑफपर्यंत सहज पोहोचला होता. यंदा सनरायजर्स हैदराबाद संघाची मोहीम दि. 11 एप्रिल रोजी केकेआरविरुद्ध लढतीने सुरु होईल.