वृत्तसंस्था/ दुबई
ऑस्ट्रेलियाचा सलामीचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नर याला सध्या बॅडपॅच मधून जावे लागत आहे. फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. दरम्यान आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सनरायजर्स हैद्राबाद संघाने त्याला अंतिम अकरा खेळाडूंमधून वगळण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आपण पुन्हा स्टेडियमवर खेळताना दिसणार नाही, असे प्रतिपादन वॉर्नरने केले.
सोमवारी येथे राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैद्राबाद यांच्यातील झालेल्या सामन्यात वॉर्नरला अंतिम अकरा खेळाडूंत स्थान मिळू शकले नाही. या सामन्यात हैद्राबाद संघाने राजस्थानचा 7 गडय़ांनी पराभव केला. हैद्राबाद संघाची या स्पर्धेतील कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली असून त्यांनी 10 पैकी केवळ 2 सामने जिंकले आहेत. स्पर्धेच्या गुणतक्त्यात हा संघ तळाच्या स्थानावर आहे. मात्र या संघाच्या फ्रांच्यायजीनी नाराजी व्यक्त केल्याने वॉर्नरने आपण यापुढे मैदानावर खेळताना दिसणार नाही, असे विधान केले होते. आयपीएल स्पर्धेत वॉर्नरने 8 सामन्यांतून 24.37 धावांच्या सरासरीने केवळ 181 धावा जमविल्या आहेत. 2014 साली वॉर्नर हैद्राबाद संघामध्ये दाखल झाला.