पतीच्या जाचाला कंटाळून संपविले जीवन : कॅम्प पालिसात तक्रार
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशपूर येथील एका डॉक्टर महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली आहे. कॅम्प पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पतीच्या जाचाला कंटाळून तिने आपले जीवन संपविल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
डॉ. पावणी रवीराज दंडावतीमठ (वय 31, रा. गणेशपूर) असे त्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. बुधवारी सकाळी 10 ते 1 यावेळेत तिने माहेरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. घटनेची माहिती समजताच कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. पावणी यांचे दहा वर्षांपूर्वी अंजनेयनगर येथील डॉ. रवी उर्फ रवीराज दंडावतीमठ (वय 37) याच्याशी लग्न झाले होते. दाम्पत्यातील कलहामुळे गेल्या काही वर्षांपासून पावणी माहेरी राहत होत्या. रवी या ना त्या कारणाने पावणी यांना त्रास द्यायचा. घटस्फोटासाठी न्यायालयात खटलाही चालला होता. याच मनस्तापातून तिने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.
डॉ. रवी उर्फ रवीराज याच्यावर वडिलांचा खून केल्याचा आरोप आहे. 1 फेब्रुवारी 2018 रोजी रवीने आपले वडील डॉ. उमाकांत शिवलिंगय्या दंडावतीमठ (वय 68) यांचा भीषण खून केला होता. याप्रकरणी त्याला अटकही झाली होती. सध्या तो जामिनावर आहे. 7 डिसेंबर 2021 रोजी पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिरातील मुकुट चोरल्याप्रकरणीही तीन दिवसांनी त्याला अटक झाली होती. त्याच्या वागण्याला कंटाळलेल्या पत्नीने आपले जीवन संपविले आहे.