पुणे : सुप्रसिद्ध संगणकतज्ज्ञ पद्म विभूषण डॉ. विजय पांडुरंग भटकर यांना यंदाचा ‘डॉ. हेडगेवार प्रज्ञा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. बंगाली साहित्य क्षेत्रातील प्रतिथयश संस्था कोलकाता स्थित ‘श्री बडाबाजार कुमारसभा पुस्तकालय’ यांच्या तर्फे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
एक लाख रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कोरोना नियमांचे पालन करीत निमंत्रितांच्या उपस्थितीत पुण्यात भांडारकर संस्थेच्या सभागृहात येत्या गुरूवार, ९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता डॉ. भटकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. समरसता गुरुकुलमचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.