प्रतिनिधी/ बेंगळूर
ड्रग्ज प्रकरणी परप्पन अग्रहार कारागृहात असणाऱया कन्नड अभिनेत्री रागिणी द्विवेदी आणि संजना गल्रानी यांच्या जामीन याचिकांवर सोमवारी न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळे त्यांना जामीन मिळणार का?, याविषयी चित्रपटसृष्टीत कुतूहल निर्माण झाले आहे. दरम्यान, शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दोन्ही अभिनेत्रींची कारागृहातच स्वतंत्रपणे चौकशी केली.
अभिनेत्री रागिणी व संजना या दोघींचा ड्रग्ज माफियांशी संपर्क असल्याचा संशय बळावला आहे. या माध्यमातून दोघींनी मोठय़ा प्रमाणात आर्थिक व्यवहार केल्याचे आढळून आल्याने ईडीने त्यांची चौकशी चालविली आहे. चौकशीसाठी ईडीच्या अधिकाऱयांनी एनडीपीएस न्यायालयाकडून परवानगी घेतली होती. आर्थिक व्यवहारासंबंधी ईडीच्या अधिकाऱयांनी प्रश्नांची सरबत्ती केल्याने दोन्ही अभिनेत्रींची भंबेरी उडाल्याचे समजते.
सिनेसृष्टीतील ड्रग्ज प्रकरणासंबंधी रागिणी आणि संजनाची पाच दिवस कारागृहात चौकशी होणार आहे. त्यामुळे आणखी काही जणांची नावे उघड होण्याची शक्यता आहे.