प्रत्येकी दोन लाखांची पॉलिसी : कृष्णराज महाडिक यांचा उपक्रम : महाडिक परिवाराची सामाजिक बांधिलकी
प्रतिनिधी/कोल्हापूर
आंतरराष्ट्रीय कार रेसर आणि भाजप नेते माजी खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकाराने प्रजासत्ताक दिनी तब्बल 1187 रिक्षा व्यावसायिकांना मोफत विमा कवच लाभले. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये अडचणीत आलेल्या रिक्षाचालक आणि मालकांना दिलासा देण्यासाठी कृष्णराज महाडिक यांनी प्रत्येकी दोन लाखाच्या विम्याचे संरक्षण देऊन सामाजिक बांधिलकी जपली.
प्रजासत्ताक दिनी करवीर संस्थापिका रणरागिणी छत्रपती ताराराणी चौकातील नवभारत टेडिंग कंपनीच्या पेट्रोल पंपावर विमा पॉलिसी नोंदणीचा कार्यक्रम झाला. माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून झालेल्या या उपक्रमात शहरासह जिल्हÎातील रिक्षाचालक आणि मालकांनी गर्दी केली होती. पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक आणि कृष्णराज महाडिक यांच्यासह रिक्षा संघटनेच्या नेत्यांच्या हस्ते, तुळशीच्या रोपाला पाणी घालून या उपक्रमाला सुरूवात झाली.
यावेळी रिक्षा सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे चंद्रकांत भोसले, रिक्षा सेनेचे वसंत पाटील, कोल्हापूर जिल्हा वाहनधारक संघाचे विजय गायकवाड, मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव, करवीर ऑटो रिक्षा युनियनचे सुभाष शेटे, आदर्श ऑटो रिक्षा युनियनचे ईश्वर चैनी, न्यू करवीर ऑटो रिक्षा युनियनचे राजेंद्र थोरावडे, आदिनाथ दिंडे, शर्पूद्दिन शेख, संजय केसरकर उपस्थित होते. सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत पार पडलेल्या या विशेष शिबीरातून, तब्बल 1187 रिक्षा व्यावसायिकांना विम्याचे संरक्षक कवच लाभले. लॉकडाऊनच्या काळात रिक्षा व्यावसायिकांचे नुकसान झाले. या कष्टकरी वर्गाला किमान दिलासा देण्यासाठी हा उपक्रम आखल्याचे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले. या उपक्रमादरम्यान कृष्णराज आणि पृथ्वीराज महाडिक यांनी रिक्षा व्यावसायिकांशी चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. माजी खासदार धनंजय महाडिक यांनीही उपक्रमस्थळी भेट दिली. यापुढेही रिक्षा व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तयार असल्याचे त्यांनी सांगितले.