मार्केट पोलिसांची कारवाई : पत्नीलाही लवकरच अटक होणार
प्रतिनिधी / बेळगाव
अपहरण करून सोमनट्टी (ता. बेळगाव) येथील एका तरुणाचा खून केल्याच्या आरोपावरून मार्केट पोलिसांनी बुधवारी तिघा जणांना अटक केली आहे. खून झालेल्या तरुणाच्या पत्नीलाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे मार्केट पोलीस स्थानकाच्या अधिकाऱयांनी सांगितले.
बाळाप्पा भगवंताप्पा दिन्नी, बसवराज यल्लाप्पा उप्पार (दोघेही रा. कोळय़ानट्टी), मंजुनाथ पिराप्पा बिडी (रा. संपगाव) अशी पोलिसांनी अटक केलेल्या तिघा जणांची नावे आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. सोमनट्टी येथील सागर गंगाप्पा पुजेरी (वय 23) या तरुणाचा 11 फेब्रुवारी रोजी अपहरण करून खून करण्यात आला होता. खुनानंतर उळवीजवळील दरीत सागरचा मृतदेह फेकून देण्यात आला होता.
या प्रकरणी 22 फेब्रुवारी रोजी सागरचे वडील गंगाप्पा पुजेरी यांनी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. सागरची पत्नी निलम्मा हिच्या सांगण्यावरून हा खून करण्यात आला आहे. मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर, एस. बी. खानापुरे, वीरुपाक्षी बुदण्णावर, एल. एस. कडोलकर, आशीर जमादार, विश्वनाथ माळगी, एम. एस. चावडी, यल्लाप्पा कोच्चरगी, चिक्काण्णा केरनाईक, एस. एम. करलिंगण्णावर, खादरसाब खानम्मण्णावर व एसीपी कार्यालयातील एफ. बी. मुजावर, सतीश ढाले, नवीन, अनिल, महेश कौजलगी आदींनी ही कारवाई केली.