जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव यांची माहिती
कुंभोज /वार्ताहर
कुंभोज तालुका हातकणंगले येथे नव्याने बांधण्यात आलेल्या कुंभोज प्राथमिक आरोग्य केंद्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असे वृत्त दैनिक तरुण भारत ने प्रसिद्ध केले होते. सदर वृत्ताची दखल घेत कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीचे माजी सभापती व कुंभोज जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव यांनी याबाबत तात्काळ निर्णय घेऊन महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर त्यांच्याशी संपर्क साधून येणाऱ्या पंधरा दिवसात कुंभोज आरोग्य केंद्राच्या सुसज्ज इमारतीचे उद्घाटन केले जाईल, असा खुलासा केला. त्याच पद्धतीने सदर इमारतीसाठी आत्तापर्यंत अडीच कोटी रुपये खर्च झाले असून उर्वरित दीड कोटी रुपयांच्या निधीतून सदर इमारतीला कंपाउंड व अन्य कामे करण्यात येणार असून त्याही कामाला लवकरात लवकर सुरुवात केली जाईल असेही त्यांनी दैनिक तरुण भारतशी बोलताना सांगितले.
परिणामी येणारे 15 दिवसाच्या आत आरोग्य केंद्र साठी लागणारा शासकीय कर्मचाऱ्यांची जागा भरती करून, आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या उपस्थितीत सदर प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन केले जाईल ,कुंभोज ग्रामस्थ यांच्या मागणीवरून अतोनात प्रयत्न करून जिल्हा परिषद शिक्षण सभापती असताना प्रवीण यादव यांच्या प्रयत्नातून व माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्या सहकार्यातून कुंभोज येथे साडेतीन कोटींची सुसज आरोग्य केंद्राची इमारत मंजूर झाली.
परिणामी सदर इमारत सध्या बांधून सुव्यवस्थित असून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याचे वृत्त दैनिक तरुण भारतने प्रसिद्ध केले होते, या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी कुंभोज येथे ग्रामपंचायत यांची बैठक लावून येत्या पंधरा दिवसात सदर इमारतीचे उद्घाटन घेतली जाईल असा खुलासा. दैनिक तरुण भारतशी बोलताना केला.