आमदार सुदिन ढवळीकरांचा प्रस्ताव
वार्ताहर / मडकई
सत्तरी तालुक्यातील शेळ मेळावली भागात आयआयटी प्रकल्पाला विरोध असल्यास फर्मांगुडीत आम्ही त्याचे स्वागतच करु. फर्मागुडीतील गोवा अभियांत्रिकी कॉलेजच्या पठाराव 3 लाख चौ. मिटर जमीन उपलब्ध आहे. याठिकाणी आयआयटी आल्यास फोंडा तालुक्याला शैक्षणिक हब म्हणून ओळख प्राप्त होईल. सरकारने तसा विचार करावा, अशी मागणी मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली आहे.
फर्मागुडी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोवा अभियांत्रीकी महाविद्यालाजवळ 3 लाख चौ. मिटर जमिन उपलब्ध आहे. आयटीआय कॉलेजवळही जवळील लाखो चौ. मिटर जमीन ताब्यात घेतल्यास याठिकाणीही सोय होऊ शकेल. प्रियोळकडे जाण्याऱया रस्त्याच्या बाजुची 1 लाख चौ. मिटर जमिनही वापरता येईल. आयआयटीसाठी 9 लाख चौ. मिटर जमिन आवश्यकता असली तरी काही प्रमाणात तडजोड करावी लागेल. सद्या आयआयटीचे विभाग गोवा अभियांत्रीकी महाविद्यालयात चालतो. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात आपण मंत्री असताना केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या सहकार्यांने आयआयटी गोव्यात आणण्यासाठी प्रयत्न केले होते. गोवा अभियांत्रीकी महाविद्यालय, आयआयटी आणि व एनआयटीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह आपण मंत्री असतानाच उभारण्यात आले होते. त्यामुळे आज कोविड निगा केंद्राची तेथे सोय करता आली. तेथील रस्त्याला काही विघ्नसंतोषी लोकांचा त्यावेळी विरोध होता. हा विरोध मोडून काढीत रस्ता व वसतीगृह उभायण्यात आले. आज त्या रस्त्याचाही वापर होत आहे, हे सध्याच्या पालकमंत्र्यांनी ध्यानात ठेवावे.
सरकारच्या निष्काळजीपणाचे बळी
कोरानाच्या वाढत्या प्रभावामुळे गोव्यात अठरा जणांचे बळी गेले. जनतेची काळजी घेण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. डिसेंबर 2020 पर्यंत हा कोरानाचा संसर्गं गोव्यात राहणार आहे व तोपर्यंत जनतेची काळजी सरकारला घ्यावी लागेल. मुंबईतील धारावी झोपडपट्टीत 10 लाख लोकसंख्या आहे. पण तेथे कोरोनाची फारशी बाधा झाली नाही. गोवा ग्रीन झोनमध्ये असतानाही ही परिस्थिती कशी उद्भवली याला जबाबदार कोण ? असा प्रश्न आमदार ढवळीकर यांनी उपस्थित केला. वास्कोतील जुवारी नगर, मांगोरहील येथील झोपडपट्टी, फोंडा शहापूर येथील झोपडपट्टी, धारबांदोडातील झोपडपट्टी याठिकाणी राहणाऱया लोकांची तपासणी करा अशी मागणी आपण लॉकडाऊनच्या काळात केली होती. पण त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले.
खासगी इस्पितळांवर दबाव आणू नये
कोरोना बाधीतांना इस्पितळात न्यायला सरकारला तीन दिवस लागतात. दोन वेंटिलेटर उपलब्ध आहेत, असे सरकार सांगते, पण ते अद्याप मिळत नाहीत. वाढत्या संसर्गामुळे 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या डॉक्टर्सना आपले दवाखाने बंद ठेवावे लागले आहेत. अजून सरकारकडे औषधे उपलब्ध नाहीत. खासगी इस्पितळातचे अतिदक्षता विभाग कोविड रुग्णांसाठी वापरले जातील असे सरकार सांगते. हे विभाग ताब्यात घेतल्यास इतर रुग्ण त्या इस्पितळात फिरकणार नाहीत. खासगी डॉक्टर्स अशा परिस्थितीत इस्पितळे कशी चालवतील. अशा प्रकारे डॉक्टर्सवर दबाव आणता येणार नाही. कुंकळी मडगाव येथील व्हॉकार्ट इस्पितळ सध्या बंदच आहे. हवे असल्यास सरकारने ते ताब्यात घ्यावे, असेही ते म्हणाले.
फोंडय़ातील मंत्री केवळ भाषणे करतात मंत्री गोविंद गावडे यांच्यावर निषाणा साधताना काही मंत्री फोंडय़ात सरपंच व पंचसदस्याच्या बैठका घेऊन केवळ नाटकी भाषणे ठोकतात. प्रत्यक्ष कुठलीच कृती दिसत नाही. प्रियोळ, शिरोडा व फोंडा मतदार संघात अजून आयुष मंत्रालयाने दिलेल्या रोगप्रतिकार शक्तीवर्धक गोळय़ा लोकापर्यंत पोचलेल्या नाहीत. आपल्या मडकई मतदार संघात नऊ हजार रोगप्रतिकार शक्तीवर्धक गोळय़ांचे वाटप घरोघरी करण्यात आले आहे. प्रियोळ, शिरोडा व फोंडा मतदार संघातील बरेच लोक या औषधांसाठी आपल्याकडे येत आहेत असेही ते म्हणाले.