अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेतील नागरिक वा संपत्तीवर हल्ला केल्यास इराणमधील 52 ठिकाणांवर आम्ही विध्वंसक हल्ला करू, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. दरम्यान, अमेरिकेच्या बगदादमधील दूतावासावर रॉकेट हल्ला करून मशिदीवर लाल झेंडा फडवत इराणने युद्धाची अप्रत्यक्ष घोषणा केल्याचे मानले जात आहे. या घडामोडींमुळे दोन्ही देशांमध्ये अभूतपूर्व तणाव निर्माण झाला आहे. यामुळे संपूर्ण जगभरात चिंता व्यक्त होत आहे.
अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे कमांडर जनरल कासिम सुलेमानी ठार झाले होत. शनिवारी रात्री इराणने यास प्रत्युत्तर दिले. इराकची राजधानी बगदादमध्ये असणाऱया अमेरिकेच्या दूतावास आणि बलाद येथील सैन्य छावणीवर रॉकेट हल्ला केला. याने एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात झालेल्या नुकसानीचा तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाही; पण इराकने अमेरिकेला प्रत्युत्तर दिले असल्याचे मानले जात आहे. याची गंभीर दखल अमेरिकेचे राष्ट्राध्क्ष ट्रम्प यांनी घेतली. यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, आम्ही कासिम सुलेमान याचा खात्मा करून जगाला दहशतवादी नेत्यापासून मुक्ती दिली आहे. इराणने अमेरिकेतील नागरिक व संपत्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास या देशाला मोठी किंमत चुकवावी लागेल. इराणमधील 52 ठिकाणांवर तत्काळ विध्वंसक हल्ला केला जाईल. ही सर्व ठिकाणे या देशासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. जो कोणी अमेरिकेचे नुकसान करेल, आम्ही त्याला शोधून काढू आणि त्याचा खात्मा करू. माझ्या नेतृत्त्वाखाली अमेरिकेची दहशतवादविरोधात भूमिका स्पष्ट आहे. दरम्यान, इस्त्रायलचे पंतप्रधान पॉम्पियो यांनी अमेरिकेच्या कारवाईचे समर्थन केले आहे. आमची अमेरिकेबरोबर मैत्री अतूट आहे. आम्ही दहशतवादाविरोधात एकत्रित लढणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
अमेरिकेच्या धमकीत नवे काय?
अमेरिकेची धमकी आमच्यासाठी नवी नाही, असे इराणचे मंत्री मोहसीन जवादी यांनी म्हटले आहे. बगदादमधील अमेरिकेच्या दूतावासावर झालेला हल्ल्याचे आम्ही समर्थन करणार नाही. आमचे कोणाशीही वैर नाही; पण आमच्यावर हल्ला झाल्यास आम्ही सडेतोड उत्तर देऊ असेही त्यांनी नमूद केले.
अमेरिकेत युद्धविरोधात निदर्शने
न्यूयॉर्कमधील टाईम स्क्वेअर परिसरातील शेकडो नागरिकांनी इराणविरोधात केलेल्या हल्ल्याविरोधात निदर्शने केली. युद्धापेक्षा रोजगार, आरोग्य, शिक्षण या मूलभूत बाबींकडे सरकारने लक्ष द्यावे, असे आवाहन ट्रम्प सरकारला करण्यात आले. न्याय नको, शांती हवी, इराणबरोबर युद्ध नको, असे फलक घेऊन नागरिक निदर्शनामध्ये सहभागी झाले होते.
महत्त्वाची चौकट पान एकवरच घेणे
इराणकडून युद्धाची घोषणा ?
अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात कमांडर जनरल कासिम सुलेमानी ठार झाल्यानंतर इराणने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शनिवारी सकाळीच इराणमधील सर्वात पवित्र मानल्या जाणाऱया जामकारन मशिदीवर लाल झेंडा फडकविण्यात आला. अशा परिस्थितीमध्ये लाल झेंडा फडकवणे म्हणजे युद्धाची घोषणा तसेच सरकारने देशातील नागरिकांना युद्धाला सामोरे जाण्याचे संकेत दिल्याचे मानले जात आहे.